अतिक्रमणे हटवून अवैध धंद्यांना आळा
By Admin | Updated: January 20, 2016 01:18 IST2016-01-20T01:18:38+5:302016-01-20T01:18:38+5:30
भोर-मांढरदेवी मार्गावरील वाहतुकीस अडथळा ठरणारी अतिक्रमणे हटवून अवैध धंद्यांना आळा घालून यात्राकाळात कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची खबरदारी

अतिक्रमणे हटवून अवैध धंद्यांना आळा
भोर : भोर-मांढरदेवी मार्गावरील वाहतुकीस अडथळा ठरणारी अतिक्रमणे हटवून अवैध धंद्यांना आळा घालून यात्राकाळात कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची खबरदारी घेऊन भविकांना चांगली सेवा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना उपविभागीय अधिकारी मौसमी बर्डे-चौगुले यांनी दिल्या.
मांढरदेवी काळुबाईची यात्रा २३ ते २५ जानेवारीदरम्यान होणार आहे. या निमित्ताने बर्डे यांनी भोर तालुक्यातील सर्व शासकीय अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. तहसीलदार वर्षा शिंगण, नायब तहसीलदार डॉ. धनंजय जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक भरते, सहायक गटविकास अधिकारी साळवे, डॉ. राजेश मोरे, पो.नि. श्रीकांत खोत, पशुधनविकास अधिकारी डॉ. सचिन देशपांडे,आगार प्रमुख युवराज कदम, मुख्याधिकारी संजय केदार उपस्थित होते.
बर्डे म्हणाल्या, मांढरदेवीच्या दर्शनासाठी भोरवरुन आंबाडखिंड घाटातून ७० टक्के भाविक जातात. त्यामुळे शहरासह मार्गावर वाहतुकीची कोंडी होते. या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, भाविकांना चांगली सेवा मिळावी यासाठी भोर-मांढरदेवी मार्गावरील हॉटेल व इतरत्र असणारे अवैध धंदे बंद करुन धूम्रपान करणाऱ्यांवर कारवाई करावी. वाहतुकीत अडथळा ठरणारी अतिक्रमणे हटवून वाहतूक सुरळीत करावी. भोर एसटी आगाराकडून यात्राकाळात मांढरदेवीला जाणाऱ्या भाविकांसाठी १०० एसटी बसची यवस्था करण्यात आली आहे. या वेळी भोर पंचायत समिती, पोलीस, उपजिल्हा रुग्णालय, पंचायत समिती आरोग्य विभाग, महसूल विभाग, सार्वजनिक बांधकाम आदींनी तयारीचा आढावा दिला.