बारामतीतील निकालाकडे सर्वांचे लक्ष
By Admin | Updated: February 23, 2017 02:24 IST2017-02-23T02:24:42+5:302017-02-23T02:24:42+5:30
जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०१७साठी मंगळवारी मतदान प्रक्रिया पार पडली. या

बारामतीतील निकालाकडे सर्वांचे लक्ष
बारामती : जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०१७साठी मंगळवारी मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीच्या निकालासाठी आता अवघे काही तास उरले आहेत. गुरुवारी (दि. २३) येथील एमआयडीसीतील वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये सकाळी १० वाजता मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात करण्यात येईल. राजकीय भवितव्य ठरविणाऱ्या या निवडणुकीच्या निकालाची सर्वांनाच मोठी प्रतीक्षा आहे. मतदानानंतरदेखील केंद्रनिहाय झालेल्या मतांची आकडेमोड करण्यात आज उमेदवार, कार्यकर्त्यांनी वेळ घालविला.
मतमोजणी प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी शंकरराव जाधव, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी हनुमंत पाटील यांनी दिली. एमआयडीसीतील वखार महामंडळाच्या गोडाऊनध्ये सकाळी १० वाजता मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. ईव्हीएम मशीनमधील मतांची मोजणी २४ टेबलांवर, तर टपाली मतांची मोजणी ६ टेबलांवर करण्यात येणार आहे. सुरुवातील टपाली मतमोजणी करण्यात येईल. त्यानंतर एक गट व त्याअंतर्गत असणाऱ्या गणांतील मतांची मोजणी करण्यात येईल. अशा प्रकारे क्रमाने असणारे सहा गट व त्याअंतर्गत असणाऱ्या गणांची मोजणी करण्या येणार आहे. प्रत्येक मतमोजणी टेबलावर ३ याप्रमाणे ९० कर्मचारी, ४ रो आॅफिसर, स्ट्राँगरूममध्ये मशिन वाटपासाठी २४, सील करणे, नमुना ईव्हीएमसाठी १२, आकडेवारी संकलनासह दोन संगणक कक्षासाठी १२, माध्यम कक्षासाठी ४, राखीव १० कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात
येणार आहे.
मतमोजणीदरम्यान बंदोबस्तासाठी १ पोलीस निरीक्षक, १ फौजदार यांच्यासह ६० पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. मतमोजणीसाठी येताना उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींनी निवडणूक विभागाने दिलेल्या पाससह ओळखपत्र आणणे बंधनकारक असून दिलेला पास दर्शनीजागी लावणे आवश्यक आहे.
...यंदाच्या मतदानात
५.०९ टक्के वाढ
बारामती तालुक्यात यंदा जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत एकूण ७१.४३ टक्के मतदान झाले आहे. २०१२मध्ये या निवडणुकीतील मतदान ६६. ३४ टक्के होते. यंदाच्या मतदानात ५.०९ टक्के वाढ झाली आहे. वाढलेला टक्का कोणाच्या पारड्यात जाणार? या मतदानाने कोणाचे पारडे जड होणार? याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. राज्यात सत्तापरिवर्तन झाल्यानंतरची तालुक्यातील ही निवडणूक आहे.
टपाली मतदान मोजण्यासाठी
स्वतंत्र सोय...
टपाली मतदान मोजण्यासाठी विलंब होतो. त्यामुळे पहिल्या गटाची मतमोजणी सुरू असतानाच टपाली मतदानाची मोजणीदेखील होणार आहे. त्यामुळे प्रत्यक्ष मतमोजणीला होणारा विलंब टळेल, असे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी हनुमंत पाटील यांनी सांगितले. मतमोजणी केंद्रावर सर्व सुविधा करण्यात आल्या आहेत. मतमोजणी शांततेत पार पाडण्यासाठी सर्व पक्षांच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
गावभर रंगल्या निवडणुकीच्या चर्चा
च्अकोले : काल झालेल्या मतदानाच्या नंतर आजचा अख्खा दिवस निवडणुकीत कोण जिंकणार या चर्चेच्या गप्पा गावभर रंगल्या. जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीचे मतदान इंदापूर तालुक्यात आणि शेटफळगढे पंचायत गणात जवळ जवळ ७०ते७५ ट्क्के मतदान झाले आहे.त्यामुळे लोकांचा उत्साह उद्याच्या होणाऱ्या निकालाकडे लागला आहे.
मतदानाची आकडेवारी आणि लोकांनी उत्स्फूर्तपणे केलेले मतदान यामुळे दिवसभर निकालाच्या चचेर्ची गुऱ्हाळ गावोगावी सुरु असल्याचे चित्र पाहायला मिळत होते. कार्यकर्त्यांनी मतदार याद्यातून झालेल्या मतदानावरून किती मतदान आपल्या उमेदवाराला होईल ,याची पण चाचपणी करून बघितली आहे. त्यामुळे पारावरील चर्चेत लोकांनी एकमेकांना ‘टार्गेट’ करून अमुक उमेदवार इतक्या मतांनी निवडूनच येणार हे सांगण्यात अख्खा दिवस घालवला. असे प्रकार दिवसभर गावोगावी पाहायला मिळत होते.
इंदापूरमध्ये निवडणूक निकालावर कार्यकर्त्यांचा पैजा
वालचंदनगर : जिल्ह्यात सर्वत्र पंचायत समिती व जिल्हा परिषद पंचवार्षिक निवडणूकांचे भवितव्य मतपेटीत बंद झाल्याने चचेर्ला ऊत आलेला आहे. जो तो आपलेच मत भाकीत करून आपली प्रतिष्ठा राखून ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. ग्रामीण भागात गटात व गणात उमेदवारापेक्षा मतदारातच पैजा लावायला सुरूवात झाली आहे. कोणी पैशावर तर कोणी जेवणावर पैजा लावत आहेत. मतदान संपल्यानंतर आता निकालाच्या पार्श्वभुमीवर फक्त पैजेला तालुक्यात ऊत आला आहे.
इंदापूर तालुक्यात माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील व आमदार दत्तात्रय भरणे यांचा प्रचारात एकमेकांवर टिकेची झोड उठविली होती. या पंचवार्षिक निवडणूकीत प्रचारासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी दिवसभर जेवणावळी, वडापाव आदींचा वापर झाला. जवळपास पंधरा दिवस घरचे अन्न त्याग करणाऱ्यांना घरचे अन्न गोड लागत नसल्याचे चित्र होते. पक्षाचे प्रचार करणारा कार्यकर्ता आपल्याच पक्षाचा उमेदवार निवडून येणार असल्याच्या वल्गना करत आहे. १ हजारांपासून ते १० हजारापर्यंत पैंजा लावल्याचे चित्र आज होते.