सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे प्रचारावर लक्ष
By Admin | Updated: February 12, 2017 04:53 IST2017-02-12T04:53:46+5:302017-02-12T04:53:46+5:30
महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांनी अनेक सोसायट्यांना मोफत सीसीटीव्ही कॅमेरे बसवून दिले आहेत. मात्र, या सीसीटीव्हीचे कंट्रोल त्यांनी स्वत:कडे ठेवले आहे.

सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे प्रचारावर लक्ष
पुणे : महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांनी अनेक सोसायट्यांना मोफत सीसीटीव्ही कॅमेरे बसवून दिले आहेत. मात्र, या सीसीटीव्हीचे कंट्रोल त्यांनी स्वत:कडे ठेवले आहे. त्यातील फुटेजची दररोज पडताळणी करून महापालिका निवडणुकीमध्ये विरोधी पक्षाचे उमेदवार, कार्यकर्ते सोसायट्यांमध्ये कोणाला भेटत आहेत, कसा प्रचार करीत आहेत, यावर त्यांच्याकडून बारीक लक्ष ठेवले जात आहे. उमेदवारांच्या कुरघोड्यांमुळे निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापू लागले आहे.
शहराच्या विविध भागांमध्ये हजारो लहान-मोठ्या सोसायट्या आहेत. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या बैठका इच्छुक उमेदवारांकडून घेतल्या जातात. उमेदवाराकडून स्व:खर्चातून सोसायट्यांच्या इमारतींना रंग देऊ, दिवे बसवू, फरशी टाकून देऊ, अशी आश्वासने दिली जायची, त्यामध्ये आता सीसीटीव्ही बसवून देण्याचे मोठे फॅड निघाले आहे.
सोसायट्यांच्या संरक्षणासाठी पोलिसांनी सर्व सोसायट्यांना सीसीटीव्ही बसविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे उमेदवारांकडून सोसायटीमध्ये मोफत सीसीटीव्ही बसवून देण्याची आॅफर दिली जात आहे. अनेक सोसायट्यांनीही ही आॅफर स्वीकारून सोसायट्यांच्या प्रवेशद्वारात, तसेच आतील भागात सीसीटीव्ही बसवून घेतले आहेत. उमेदवारांनी हे सीसीटीव्ही बसविताना त्याचे कंट्रोल स्वत:कडे ठेवले आहे. निवडणुकीच्या काळात या सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करण्यासाठी उमेदवारांनी विशेष यंत्रणा कार्यान्वित केली आहे. त्यानुसार दररोजच्या दररोज सोसायट्यांमध्ये विरोधी पक्षाचे उमेदवार, कार्यकर्ते कोणाला भेटत आहेत यावर त्यांच्याकडून बारीक लक्ष ठेवले जात आहे. मोफतचा मारा करून सोसायट्यांची मते विकत घेतलेल्या उमेदवारांनी सीसीटीव्हीच्या मदतीने सोसायट्यांवर लक्ष ठेवण्याचा फंडा अवलंबला आहे.
काहीही करून निवडणूक जिंकायची, या हेतून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या कोट्यधीश उमेदवारांकडून हा फंडा वापरला जात आहे. धनकवडी, कात्रज, कोथरूड, औंध, हडपसर, कल्याणी नगर, बाणेर आदी भागांमध्ये थोड्या बहुत फरकाने हे प्रकार सुरू आहेत. मोफत सीसीटीव्ही मिळविण्याच्या नादात सोसायट्यांची सुरक्षा व्यवस्था खासगी व्यक्तीच्या ताब्यात जात आहे.
इच्छुक उमेदवारांनी सोसायटीची विविध कामांचा खर्च द्यावा, यासाठी काही सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांकडून दबाव टाकला जात असल्याचे एका इच्छुक उमेदवारांनी सांगितले. तुम्ही हा खर्च दिला नाही, तर तुम्हाला आमच्या सोसायटीतील एकही मत मिळणार नाही, असे सांगून उमेदवारांवर दबाव टाकला जातो. त्यामुळे काही इच्छुकांना इच्छा नसतानाही सोसायट्यांच्या खर्चाचा भार उचलावा लागत आहे.
(प्रतिनिधी)
त्यांच्यापेक्षाही वाईट तऱ्हा
वस्त्या, झोपडपट्ट्यांमध्ये राहणारा
मतदार पैसे घेतल्याशिवाय मतदानाला
बाहेर पडत नाही, असं सर्रास बोलले
जाते. मात्र, सोसायट्यांमधील शिक्षित मतदारांकडून, तर दबावतंत्राचा वापर
करून उच्चभ्रू लूट केली जात असल्याचे स्पष्ट होत आहे.
महापालिकेच्या खर्चातूनही सोसायट्यांची कामे
अनेक इच्छुक उमेदवार त्यांच्या खर्चातून सोसायट्यांची कामे करतातच. मात्र, काही विद्यमान नगरसेवकांनी महापालिकेच्या निधीमधून सोसायट्यांची कामे करून दिली आहे. खासगी जागांवर पालिकेचा पैसा खर्च करता येत नसतानाही सर्रास पालिकेचा निधी सोसायट्यांमध्ये वापरला गेला आहे.