पुणेः पूर्ववैमनस्यातून कोयत्याने वार करून तरुणाच्या खुनाचा प्रयत्न केल्याची घटना येरवडा येथे घडली.
येरवडा पोलिसांनी इस्माईल मैनुद्दिन शेरेकर (वय १८, रा. लक्ष्मीनगर येरवडा) याला अटक केली आहे. त्याच्यासह ७ ते ८ साथीदारांविरुद्ध जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
रोहित राजेंद्र वाघमारे (वय २०, रा. लक्ष्मीनगर) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना येरवडा येथील भाजी मार्केट येथील शंकर मंदिराच्या समोर मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. शेरेकर आणि फिर्यादी वाघमारे हे दोघे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. कॉलेजमध्ये असल्यापासून त्यांच्यात भांडणे सुरू होती. दरम्यान पूर्ववैमनस्यातून शेरेकर याने त्याच्या साथीदारांना जमा करून हातात कोयते घेऊन वाघमारे याला शिवीगाळ करत जिवे ठार करण्याच्या हेतूने वार केले. त्यावेळी वाघमारे याने वार चुकवत पळ काढला असता, शेरेकर याच्या इतर साथीदारांनी पाठलाग करत दहशत निर्माण करण्याच्या हेतूने गाडीची तोडफोड केली.