साखरपुड्यातील जेवणावरून खुनाचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:18 IST2021-02-23T04:18:11+5:302021-02-23T04:18:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : साखरपुड्यातील जेवणावरून हिणविल्यानंतर झालेल्या भांडणातून नऊ जणांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी खडकी ...

साखरपुड्यातील जेवणावरून खुनाचा प्रयत्न
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : साखरपुड्यातील जेवणावरून हिणविल्यानंतर झालेल्या भांडणातून नऊ जणांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक झाली आहे.
वाहेदा शेख, शाहरूख नबू शेख, शौकत नबू शेख, मोहसीन निसार खान, निसार जंगू खान, यासीन खान, शबाना निसार खान (सर्व रा. पाटील इस्टेट, पुणे) आणि आसिफ शेरू शेख आणि रूकसाना शेख (रा. कोंढवा) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शौकत नबू शेख आणि निसार जंगू खान यांना अटक झाली आहे. गौरी सईद शेख (२२, रा. महात्मा गांधी वसाहत, वाकडेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार २० फेब्रुवारीला रात्री साडेसात ते नऊ वाजण्याच्या दरम्यान घडला.
फिर्यादी गौरी शेख आणि आरोपी शेजारी राहण्यास असून नातेवाईक आहेत. संशयित आरोपी रूकसाना शेख हिच्या मुलीच्या साखरपुड्याचा कार्यक्रम असल्याने गौरी शेखच्या कुटुंबातील सर्व सदस्य त्या कार्यक्रमासाठी गेले होते.
साखरपुडा झाल्यावर जेवण सुरू असताना फिर्यादीचे पती सईद शेख गेले असता जेवण संपत आले होते. तेव्हा संशयित आरोपी आसिफ शेरू शेख म्हणाला, ‘थाली तेरे लिए चाटणे को रखा है, तुझे खाने को नही मिलता तू चाट,’ असे बोलून शिवीगाळ करू लागला. तेव्हा गौरी यांनी त्यास शिवीगाळ का करतो अशी विचारणा केली. त्यावर आसिफ शेखने गौरी यांनीही शिवीगाळ केली. त्याचा राग मनात धरून आरोपींनी मजिद मेहबूब खान व त्यांचा मुलगा शौकत मजिद खान यांना व गौरी यांना जिवे ठार मारण्याच्या प्रयत्न केला.