रॉकेट उड्डाणाचा प्रयत्न अयशस्वी

By Admin | Updated: August 11, 2014 23:32 IST2014-08-11T23:26:11+5:302014-08-11T23:32:16+5:30

अयशस्वी ठरलो असलो तरी पुन्हा अधिक काळजी आणि अभ्यास करून याच ठिकाणी प्रक्षेपण यशस्वी करून दाखवू, असा विश्वास गुजरात येथील इंटरनॅशनल इंडियन युनिव्हर्सिटीचे कुलगुरू किरण नाईक यांनी व्यक्त केला.

Attempt to rocket flight failed | रॉकेट उड्डाणाचा प्रयत्न अयशस्वी

रॉकेट उड्डाणाचा प्रयत्न अयशस्वी

वैभववाडी (जि. सिंधुदुर्ग) : इंधन म्हणून साखरेचा वापर करून साडेचार किलोमीटर उडू पाहणाऱ्या रॉकेटच्या लोखंडी पाईपचे वेल्डिंग तुटल्याने त्याच्या प्रक्षेपणाचा प्रयत्न अयशस्वी ठरला. तत्पूर्वी केलेले १ किलोमीटरचे प्रक्षेपण यशस्वी झाले. हे प्रक्षेपण पाहण्यासाठी विद्यार्थ्यांसह हजारो विज्ञानप्रेमींच्या गर्दीने आचिर्णेतील वडाचा माळ फुलून गेला होता. दरम्यान, साडेचार किलोमीटर प्रक्षेपण चाचणीची ही पहिलीच वेळ होती. यामध्ये अयशस्वी ठरलो असलो तरी पुन्हा अधिक काळजी आणि अभ्यास करून याच ठिकाणी प्रक्षेपण यशस्वी करून दाखवू, असा विश्वास गुजरात येथील इंटरनॅशनल इंडियन युनिव्हर्सिटीचे कुलगुरू किरण नाईक यांनी व्यक्त केला.साखरेचा इंधन म्हणून वापर करून देशात ५०० मीटर ते एक हजार मीटरची तीन उड्डाणे यशस्वी केल्यानंतर साडेचार किलोमीटरच्या प्रक्षेपणासाठी आचिर्णेची निवड करण्यात आली होती. त्यामुळे हे प्रक्षेपण पाहण्यासाठी सकाळी ११ वाजल्यापासून आचिर्णेच्या माळरानावर विद्यार्थ्यांसह विज्ञानप्रेमींची गर्दी झाली होती. दुपारी १.४० वाजता एक किलोमीटर अंतर पार करणाऱ्या रॉकेटचे प्रक्षेपण करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांना जाण्यास सांगितले.
सायंकाळी पाचच्या सुमारास नियोजित साडेचार किलोमीटर रॉकेट प्रक्षेपणाची चाचणी घेण्यात आली. मात्र, रॉकेटच्या लोखंडी पाईपचे वेल्डिंग तुटल्याने हे देशातील सर्वांत मोठे रॉकेट प्रक्षेपण अयशस्वी ठरले. त्यामुळे संशोधक, आयोजक आणि विज्ञानप्रेमींचा काहीसा हिरमोड झाला. रॉकेट प्रक्षेपण मोहिमेत विद्यापीठाचे कुलगुरू किरण नाईक, /पान ८ वर रॉकेट तंत्रज्ञानाचे संशोधक राजेश मुनेश्वर, भावेश परमार, प्रसाद राणे, कल्पेश रावराणे, अलंकार राणे दोन दिवसांपासून व्यस्त होते. सुमारे साडेचार फूट उंचीच्या रॉकेटमध्ये सहा किलो साखरेचा इंधन म्हणून वापर केला होता. हे रॉकेट पाच ते सहा हजार किलोमीटरपर्यंत जाऊ शकते, असा त्यांचा दावा होता. मात्र, साहित्याच्या दोषामुळे ही चाचणी यशस्वी होऊ शकली नाही.
देशात संशोधनाकडे वळण्याचा कल नगण्य असल्याने बालवयात संशोधनाची रुची निर्माण करून तरुणांना विज्ञान आणि तंत्रज्ञानाकडे वळविण्याचे विद्यापीठाचे प्रयत्न आहेत. त्यातूनच आचिर्णेची निवड केली होती. तंत्रज्ञानात प्रगती झाली तरच देशाची प्रगती होऊ शकते. त्यामुळे पुन्हा प्रयत्न करून हा प्रयोग यशस्वी करू, असा विश्वास कुलगुरू नाईक यांनी व्यक्त केला. हा उपक्रम कोकण सेवा मंचने प्रायोजित केला होता. यावेळी मंचाचे इक्बाल वाणू, नजीर हुरजूक, सलीम अलवार, मुख्तार सुर्वे, आदी उपस्थित होते.
(प्रतिनिधी)

Web Title: Attempt to rocket flight failed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.