पुणे : पुणे पोलीस आयुक्त यांचे अधिकृत असणारे 'सीपी पुणे सिटी' अकाऊंट हॅक करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला. यानंतर तातडीने अकाऊंट पुन्हा 'ऍक्टिव्हेट' झाले आहे. ज्या व्यक्तीकडे या ट्विटर हँडलची जबाबदारी देण्यात आली आहे, त्याच्याकडून चुकीने वेगळ्या प्रकारचा मेसेज व्हायरल झाल्याचे पोलीस प्रशासनाकडून यावेळी सांगण्यात आले. यानंतर थोड्या वेळाने पुन्हा अकाउंट सुरू झाले आहे. याबाबत अधिक माहिती देताना आर्थिक आणि सायबर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम म्हणाले, अकाउंट हॅक असे काही झालेले नाही. ज्याच्याकडे या ट्विटर अकाउंटचा एक्सेस आहे त्याच्याकडून एक चुकीचा मेसेज व्हायरल झाला होता. त्यानंतर तातडीने ती चूक दुरुस्त करून अकाऊंट पूर्ववत सुरू करण्यात आले आहे. आता याविषयी कुठलीही तक्रार नाही. शुक्रवारी रात्री साडेबाराच्या दरम्यान सीपी पुणे सिटी या ट्विटर अकाऊंटवर नागरिकांनी कुठलेही मेसेज तसेच आलेल्या कुठलेल्या मेसेजला उत्तर देऊ नये, असे सांगण्यात आले होते.
'सीपी पुणे सिटी' ट्विटर अकाऊंट हॅक करण्याचा प्रयत्न; थोड्या वेळातच झाले पूर्ववत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2020 12:43 IST