दुचाकी चोरीच्या तपासाला ‘एटीएस’ धावले

By Admin | Updated: August 1, 2014 23:25 IST2014-08-01T22:39:29+5:302014-08-01T23:25:18+5:30

कोल्हापूरच्या दोघांची चौकशी : पुणे बॉम्बस्फोटाशी संबंध तपासण्याचा प्रयत्न

'ATS' ran for a two-wheeler theft check | दुचाकी चोरीच्या तपासाला ‘एटीएस’ धावले

दुचाकी चोरीच्या तपासाला ‘एटीएस’ धावले

सातारा : येथील जिल्हा न्यायालयाच्या आवारात दुचाकी चोरीच्या संशयावरून कोल्हापूर जिल्ह्यातील दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यानंतर तातडीने पुणे येथील ‘एटीएस’चे एक पथक साताऱ्यात तपासासाठी दाखल झाले आहे. संशयितांकडून माहिती घेण्याचे काम सुरू आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, येथील जिल्हा न्यायालयाच्या आवारात दुचाकी चोरीच्या संशयावरून महंमद रशीद नदाफ (वय २२, रा. उदगाव-जयसिंगपूर, जि. कोल्हापूर) याला व अन्य एका अल्पवयीन युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. दोघांनाही पोलीस ठाण्यात आणले. यामधील महंमद नदाफला पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केल्यावर पोलीस कोठडी मिळाली. दरम्यान, सापडलेल्या आरोपींच्या तपासासाठी पुणे येथील ‘एटीएस’चे पथक सायंकाळी साताऱ्यात दाखल झाले आहे. संशयितांकडून माहिती घेण्याचे काम सुरू आहे.
मागील १५ दिवसांपूर्वी पुणे येथे बॉम्बस्फोट झाला होता. ज्या दुचाकीमध्ये स्फोट झाला होता, ती साताऱ्यातील पोलिसाची होती. सातारा येथील न्यायालयाच्या आवारातूनच तिची चोरी झाली होती. त्यामुळेच आता सापडलेल्या दोघांचा पुणे बॉम्बस्फोट प्रकरणाशी काही संबंध आहे का, याच्या तपासासाठी ‘एटीएस’चे पथक साताऱ्यात आले असल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
पोलिसांची दक्षता..
पुणे बॉम्बस्फोटात साताऱ्याची दुचाकी वापरल्याचे समोर आल्यानंतर सातारा शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजीव मुठाणे यांनी अधिक दक्षता घेतली आहे. ज्या-ज्या ठिकाणी दुचाकींची चोरी होत आहे, अशा ठिकाणी त्यांनी साध्या वेशातील पोलीस तैनात केले आहेत. त्यामुळेच न्यायालयाच्या आवारात दोघेजण सापडले.

Web Title: 'ATS' ran for a two-wheeler theft check

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.