मोकळ्या जागेत तमाशाला परवानगीचे आश्वासन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:32 IST2021-01-08T04:32:47+5:302021-01-08T04:32:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाने मंगळवारी (दि. ५) लेखी आश्वासन दिल्यानंतर, अखिल भारतीय ...

मोकळ्या जागेत तमाशाला परवानगीचे आश्वासन
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाने मंगळवारी (दि. ५) लेखी आश्वासन दिल्यानंतर, अखिल भारतीय मराठी लोककलावंत तमाशा परिषदेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेले उपोषण मागे घेतले आहे. बंदिस्त सभागृह आणि मोकळ्या जागेत तमाशा कार्यक्रमांना परवानगी मिळाल्यामुळे कलावंतांना दिलासा मिळाला असून, पुन्हा एकदा राज्यभरात ढोलकीची थाप आणि घुंगरांची छमछममधून तमाशाचे फड रंगणार असल्याचे सांगण्यात आले.
शासनाने सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी देण्याबाबत ५ नोव्हेंबर २०२० रोजी काढलेल्या परिपत्रकातून लोकनाट्य तमाशाला वगळले होते. त्यामुळे तमाशा कलावंतांवर उपासमारीची वेळ आली. शासनाने ‘लोकनाट्य तमाशा मंडळ’ असा उल्लेख करून सुधारित परिपत्रक काढावे, यासाठी परिषदेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर फडमालकांच्या वतीने सोमवारपासून (दि.४) उपोषण चालू केले.
राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाने त्याची दखल घेऊन लेखी आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण मागे घेतल्याचे परिषदेचे अध्यक्ष आविष्कार मुळे आणि कार्याध्यक्ष संभाजी जाधव यांनी सांगितले. संभाजी जाधव म्हणाले की, आमची मागणी मान्य झाल्याने उपोषण मागे घेण्यात आले आहे. पण, काही मागण्या अजून पूर्ण व्हायच्या असून, त्यासंदर्भात लवकरच बैठक होणार आहे.