औषधविक्रेत्यावर प्राणघातक हल्ला
By Admin | Updated: June 22, 2015 04:35 IST2015-06-22T04:35:38+5:302015-06-22T04:35:38+5:30
नाना पेठ येथील एका औषधविक्रेत्याने डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय झोपेच्या गोळ्यांची औषधे देण्यास नकार दिल्याच्या रागातून एका माथेफिरूने त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला चढविला.

औषधविक्रेत्यावर प्राणघातक हल्ला
पुणे : नाना पेठ येथील एका औषधविक्रेत्याने डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय झोपेच्या गोळ्यांची औषधे देण्यास नकार दिल्याच्या रागातून एका माथेफिरूने त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला चढविला. शनिवारी रात्री ही घटना घडली़ या प्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मेडिकलमधील सीसीटीव्हीमध्ये हल्ल्याची सर्व घटना रेकॉर्ड झाली आहे.
गणेश दरेकर यांचे नाना पेठेमध्ये न्यू सेव्ह मेडिकल नावाचे औषधविक्रीचे दुकान आहे. शनिवारी रात्री ते दुकानात असताना एक तरुण त्यांच्याकडे आला. शेड्युल्ड एक्स अंतर्गत असलेल्या रिस्टाइल या झोपेच्या गोळ्या देण्याची मागणी त्याने केली. मात्र, त्याच्याकडे डॉक्टरांची चिठ्ठी नसल्याने त्याला या गोळ्या देण्यास दरेकर यांनी नकार दिला. त्यामुळे चिडून त्याने त्याच्याकडील कोयता काढून दरेकर यांच्यावर हल्ला चढविला. त्या वेळी दरेकरांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. त्यांचा आवाज ऐकून आजूबाजूचे नागरिक त्यांच्या मदतीला आले. त्या वेळी त्या तरुणाने पळ काढला.
दरेकर यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयामध्ये दाखल केले. समर्थ पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३२६ अन्वये माथेफिरू तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माथेफिरू तरुणाला झोपेच्या गोळ्यांची नशा करण्याचे व्यसन असण्याची शक्यता आहे. त्यातून चिडून त्याने हा प्रकार केला असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मेडिकलमधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो तरुण कैद झाला आहे. त्याआधारे त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न समर्थ ठाण्याच्या पोलिसांकडून केला जात आहे.
औषधविक्रेत्यावर विनाकारण झालेल्या हल्ल्यामुळे औषधविक्रेत्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
केमिस्ट असोसिएशन आॅफ पुणे डिस्ट्रिक्ट या संघटनेच्या वतीने या घटनेचा निषेध करण्यात आला आहे. माथेफिरू हल्लेखोराला तातडीने अटक करण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. समाजाच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या औषधविक्रेत्यांवर हल्ला होणे गंभीर बाब असल्याचे संघटनेचे कार्यकारिणी सदस्य नंदकुमार सांडभोर आणि संजय बिबवे यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)