आश्विन, पावनीला जेतेपद

By Admin | Updated: May 9, 2017 04:01 IST2017-05-09T04:01:15+5:302017-05-09T04:01:15+5:30

बंगळुरूच्या आश्विन भटने अभिषेक मांगलेचा आणि पुण्याच्या पावनी पाठकने सायना देशपांडेचा पराभव करून सोलारिस क्लब

Ashwin, Pavni, won the title | आश्विन, पावनीला जेतेपद

आश्विन, पावनीला जेतेपद

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : बंगळुरूच्या आश्विन भटने अभिषेक मांगलेचा आणि पुण्याच्या पावनी पाठकने सायना देशपांडेचा पराभव करून सोलारिस क्लब अखिल भारतीय १६ वर्षांखालील गटाच्या अजिंक्यपद मालिका (चॅम्पियन सिरीज) टेनिस स्पर्धेत विजेतेपद संपादन केले.
सोलारिस क्लब (मयूर कॉलनी) येथे झालेल्या अंतिम सामन्यात दुसऱ्या मानांकित आश्विन भट याने अग्रमानांकित आणि पुण्याच्या अभिषेक मांगलेचा ६-४, ६-२ असा सहज पराभव करून मुलाच्या गटाचे विजेतेपद संपादन केले. सुमारे तासभर चाललेल्या या सामन्यात आश्विन याने अभिषेकपेक्षा अधिक सरस खेळ केला. १० व्या गेमपर्यंत रंगलेल्या पहिल्या सेटमध्ये आश्विनने ६-४ असा विजय मिळवला.
दुसऱ्या सेटमध्ये आश्विनने वर्चस्व गाजवले. अभिषेकला सामन्यामध्ये परतण्याची संधी न देता ६-२ असा सहज सेट जिंकत विजेतेपद संपादन केले. दुसऱ्यांदा पुण्यामध्ये खेळण्यास आलेल्या आश्विनचे हे १६ वर्षांखालील गटाचे या वर्षीचे पहिलेच विजेतेपद ठरले. पुण्यामध्ये पहिल्यांदाच विजेतेपद मिळवणारा १४ वर्षीय आश्विन हा बंगलोर येथील डीपीएस शाळेत १० वी इयत्तेत शिकतो.
मुलींमध्ये चौथ्या मानांकित पावनी पाठक हिने पुण्यातील आणि बिगरमानांकित सायना देशपांडे हिचा ६-२, ६-४ असा सरळ सेटमध्ये पराभव करून या गटाचे विजेतेपद मिळवले. ८५ मिनिटे रंगलेल्या या सामन्यामध्ये पावनी हिने आपली विजयी घोडदौड कायम ठेवली. १३ वर्षीय पावनीने काल उपांत्य फेरीत अग्रमानांकित काम्या परब हिचा पराभव केला होता. आपला हाच फॉर्म कायम ठेवत तिने बिगरमानांकित सायना देशपांडेचा सरळ सेटमध्ये पराभव करून या वयोगटातील या वर्षातील पहिलेच विजेतेपद संपादन केले. मूळच्या पुण्याच्या असणाऱ्या पावनी हिने प्रशिक्षण आणि शिक्षणासाठी हैदराबाद येथे स्थलांतर केले असून ती हैदराबाद येथे इंडस इंटरनॅशनल शाळेत ८ वी इयत्तेमध्ये शिकते.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण सोलारिसचे संचालक जयंत पवार व स्पर्धेचे संचालक रवींद्र पांड्ये यांच्या हस्ते झाले. या वेळी क्लबचे सीईओ हृषीकेश भानुशाली व एआयटीए निरीक्षक तनया गोसावी उपस्थित होते. विजेत्यांना करंडक व प्रशस्तिपत्रक देण्यात आली.

Web Title: Ashwin, Pavni, won the title

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.