नीरा : टाळ-मृदंगाच्या गजरात व विठ्ठल नामाच्या गजरात आषाढी वारीने पंढरपूरकडे मार्गस्थ झालेल्या कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याने नीरा स्नानानंतर आज शुक्रवारी सातारा जिल्ह्यात प्रवेश केला.पालखी सोहळा सकाळी साडेसहा वाजता रामायणकार महर्षी वाल्मिकींच्या वाल्हानगरीचा निरोप घेऊन सोहळा वैभवी लवाजम्यासह लोणंद मुक्कामी मार्गस्थ झाला. सकाळी नऊ वाजता न्याहरीसाठी पिंपरे खुर्द येथील अहिल्याबाई होळकर विहिरीच्या समोर विसावा घेतला. पिंपरे ग्रामस्थांनी सोहळ्याचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले. ग्रामीण भागातील झुणका-भाकर, वेगवेगळ्या चटण्या, ताज्या रानभाज्या अशी शिदोरी घेऊन आले होते. अर्धा तासाच्या विश्रांतीनंतर पालखी सोहळा दुपारच्या भोजनासाठी व विश्रांतीसाठी नीरेकडे मार्गस्थ झाला.
नीरा नदीच्या किनाऱ्यावर निसर्गरम्य पालखीतळावर हा सोहळा साडेअकरा वाजता पोहचला. नीरा पंचक्रोशीतील भाविकांनी माऊलींच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली होती.
नीरा हिवरा पडता दृष्टी, स्नान करिता शुद्ध सृष्टी ! अंती तो वैकुंठप्राप्ती, ऐसे परमेष्ठी बोलिला !
दुपारच्या भोजन व विसाव्यानंतर दुपारी दिड वाजता हा सोहळा नीरास्नानासाठी मार्गस्थ झाला. नीरा नदीवरील जुन्या ब्रिटिश कालीन पुलावरून मंद गारवार अंगावर घेत, नगारखान्याची बैलगाडी, दोन अश्व, टाळकरी, झेंडेधारी, भगवी पताका खांद्यावर घेत वारकरी मार्गस्थ झाले. पैलतीरावर हैबतबाबांचे वंशज राजाभाऊ अरफळकर आणि सोहळा प्रमुखांच्या हातात विश्वस्तांच्या उपस्थितीत माऊलींच्या पादुका देण्यात आल्या. यावेळी माऊलींच्या पालखीरथाचे सारथ्य गणेश हुंडरे यांनी केले. 'माऊली माऊलीच्या' नामाच्या जयघोषात पालखी सोहळ्यातील रथाचे मानकरी व सोहळ्यातील मान्यवरांच्या समवेत पादुका प्रसिद्ध दत्त घाटावर आणण्यात आल्या. 'माऊली माऊलीच्या' गगनभेदी जयघोषात व टाळ-मृदंगाच्या गजरात माऊलींच्या पादुकांना भक्तीमय वातावरणात शाहीस्नान घालण्यात आले. स्नानानंतर पावसाने हजेरी लावल्याने परीसर ओला चिंब झाला. यंदा पाऊस अल्पशा प्रमाणात झाला आहे. त्यामुळे नदीपात्रात मागील आठवड्यात कमी प्रमाणात पाणी होते. त्यामुळे वीर धरणातून नीरा नदीच्या पात्रात आणि नीरा डाव्या व उजव्या कालव्यातून जादा पाणी सोडले होते. त्यामुळे नीरास्नानाचा सोहळा मोठ्या भक्तीमय वातावरणात पार पडला.