पुणे: सांगली जिल्ह्यात गोहर इथं ८ सप्टेंबर १९३३ राेजी दीनानाथ मंगेशकर आणि शेवंती मंगेशकर यांच्या पाेटी एका असामान्य गायिकेनं जन्म घेतला. आई- वडिलांनी त्यांचं नाव ठेवलं आशा. या चिमुकलीनं परिस्थितीनुसार झालेला सांगली ते पुणे, पुणे ते कोल्हापूर, कोल्हापूर ते थाळनेर, अशा विविध गावांचा मुक्काम सहज झेलला. पंधराव्या वर्षी पळून जाऊन लग्न केलं आणि आयुष्याला वेगळी कलाटणी मिळाली. संसाराला हातभार लावण्यासाठी आशाताईंकडं गाण्याशिवाय दुसरा आधार नव्हता. मुलांना मोठं करण्यासाठी त्या गात राहिल्या. मराठी आणि हिंदीतील जवळजवळ सर्व सुप्रसिद्ध संगीतकारांसोबत त्या खास त्यांच्या शैलीत गायल्या आणि रसिकांचं मन आनंदानं भरून गेलं. त्यांच्या प्रत्येक स्वरानं इंद्रधनूच्या नवरंगांची उधळण रसिकांच्या मनावर केली.
शमशाद बेगम, राजकुमारी, गीता दत्त, पारुल घोष, जोहराबाई अंबालावाली आणि साक्षात स्वरसम्राज्ञी लतादीदींच्या स्पर्धेत त्या आल्या. मिळेल ते प्रत्येक गाणं गात, अपार कष्ट घेत त्यांनी आपलं विश्व तयार केलं आणि १२ हजारांच्याहीवर, वीस भाषांमध्ये गाऊन त्यांनी सर्वांत जास्त रेकॉर्डेड गाणी गाण्याचा गिनीज बूकचा विक्रम नोंदवला. लहानपणी लता आणि आशाच्या आवाजात विलक्षण साधर्म्य होतं; पण मी लतासारखीच गायले, तर मला काम कोण देईल, या जाणिवेतून आशा गात राहिल्या, स्वतःत बदल करत गेल्या. संगीत क्षेत्रातली एक अनभिषेक्त सम्राज्ञी म्हणून त्या आयुष्यभर दिमाखात जगल्या.
‘माझं बाळ’ या सिनेमासाठी त्यांनी मराठीत प्रथम पार्श्वगायन केलं, तर १० जानेवारी १९४८ मध्ये जोहराबाई अंबालेवाली आणि खान मस्ताना यांच्याबरोबर पहिलं हिंदी गाणं त्यांनी रेकॉर्ड केलं. ‘गरीबों के दाता गरिबों के वाली है’ ‘अंधो की दुनिया’ या चित्रपटासाठी गायलेलं त्यांचं पहिलं हिंदी गाणं. या गाण्याचे संगीतकार होते वसंत देसाई. लतादीदींच्या पहिल्या गाण्यानंतर अवघ्या काही महिन्यांतच आशाताईंचं हे पहिलंवहिलं गाणं आलं. म्हणूनच आशाताईंची सांगीतिक कारकीर्द लतादीदींपेक्षाही दीर्घ ठरली.
मराठीमध्ये आशा भोसले लतादीदींपेक्षाही कित्येक वेळा सरस गाणी गाऊन गेल्या. यशवंत देव, सुधीर फडके यांच्यासोबत गायलेली मराठी भावगीतं रसिकांच्या मनात आजही रुंजी घालत आहेत. मराठीतील सुधीर फडके-आशा भोसले या जोडीनं रसिकांच्या हृदयावर कोरून ठेवणारी अगणित गाणी दिली. हिंदीमध्ये ओ.पी. नय्यर आणि पंचमदा यांच्यासोबत आशादीदींचा करिअरग्राफ शिगेला पोहोचला. अशा या महान गायिकेला त्रिवार अभिवादन.
-डॉ. गौरी दामले- सुरेल, पुणे
Web Summary : Asha Bhosle, born in 1933, faced early marriage and financial struggles. Singing became her lifeline, leading to a Guinness World Record for most recorded songs. She excelled in Marathi and Hindi, collaborating with renowned musicians and creating timeless melodies.
Web Summary : 1933 में जन्मीं आशा भोसले ने कम उम्र में शादी और आर्थिक कठिनाइयों का सामना किया। गायन उनकी जीवन रेखा बन गया, जिससे उन्हें सबसे अधिक रिकॉर्ड किए गए गीतों के लिए गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड मिला। उन्होंने मराठी और हिंदी में उत्कृष्ट प्रदर्शन किया, प्रसिद्ध संगीतकारों के साथ सहयोग किया और सदाबहार धुनें बनाईं।