कलाकारांनी माणूस घडवावा
By Admin | Updated: May 26, 2015 01:28 IST2015-05-26T01:28:00+5:302015-05-26T01:28:00+5:30
नृत्य या कलाप्रकाराने सर्व भेदाभेद ओलांडून विश्वाला जोडणे सहज शक्य आहे. माणूस आज माणुसकी विसरत चालला आहे.

कलाकारांनी माणूस घडवावा
पुणे : नृत्य या कलाप्रकाराने सर्व भेदाभेद ओलांडून विश्वाला जोडणे सहज शक्य आहे. माणूस आज माणुसकी विसरत चालला आहे. कलाकारांनी अशा माणसांना माणूस म्हणून घडविण्याचे काम हे आपल्या जीवनाचे उद्दिष्ट मानावे, अशी अपेक्षा ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांनी व्यक्त केली.
अखिल भारतीय सांस्कृतिक संघातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘हार्मनी २०१५’ या बहुभाषिक राष्ट्रीय स्तरावरील नृत्य, नाट्य, संगीत महोत्सवांतर्गत नृत्य विभागातील स्पर्धेचे उद्घाटन सोमवारी तेंडुलकर यांच्या हस्ते पं. जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे झाले. या वेळी सांस्कृतिक संघाच्या अध्यक्षा रत्ना वाघ, सचिव हेमंत वाघ, कार्याध्यक्ष श्याम भुर्के, परीक्षक केया चंदा, कांचनमाला, ललिता आदी उपस्थित होते.
तेंडुलकर म्हणाले, नृत्य या कलाप्रकाराला भाषा, प्रदेश याचे कोणतेही बंधन मर्यादित करू शकत नाही. नृत्याच्या माध्यमातून संपूर्ण विश्वाला जोडणारी वैश्विक भाषा निर्माण झाली आहे. नृत्य या कलाप्रकारात संगीत, अभिनय, गायन, वादन या सर्व कलाप्रकारांचा संगम झाला आहे. त्यामुळे नृत्य ही सर्व कलाप्रकारांची जननी आहे.
संजय भुजबळ यांनी सूत्रसंचालन केले. हेमंत वाघ यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
कलेवर प्रेम
करणारा यशस्वी
४कलाक्षेत्रात यशस्वी होण्यासाठी प्रत्येकाने कोणती ना कोणती कला आत्मसात करणे गरजेचे आहे. कलाकारांना सर्वत्र मानसन्मान प्राप्त होत असतो. कलेवर प्रेम करणारा कलाकार हा जीवनात कायमच यशस्वी होतो, असे श्याम भुर्के यांनी सांगितले.