कलावंत हा समाजाचा सच्चा प्रवक्ता
By Admin | Updated: March 8, 2015 00:57 IST2015-03-08T00:57:52+5:302015-03-08T00:57:52+5:30
चित्र-नाट्यसृष्टीतील कलाकारांना लिहिण्याचा खूप कंटाळा आहे. खरे तर कलावंत हे त्या काळातील सामाजिक चित्र अतिशय प्रांजळपणे मांडू शकतात.

कलावंत हा समाजाचा सच्चा प्रवक्ता
पुणे : चित्र-नाट्यसृष्टीतील कलाकारांना लिहिण्याचा खूप कंटाळा आहे. खरे तर कलावंत हे त्या काळातील सामाजिक चित्र अतिशय प्रांजळपणे मांडू शकतात. त्यामुळेच कोणताही कलावंत हा त्याकाळाचा पारदर्शक व सच्चा प्रवक्ता असतो. त्यासाठी कलावंतांनी आपले अनुभव लिहियला हवेत, असे मत ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी शनिवारी येथे व्यक्त केले.
संवाद, पुणे व मैत्रेय प्रकाशनाच्या वतीने प्रकाशित ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांच्या ‘नटरंगी रंगलो’ या आत्मचरित्राच्या प्रकाशनाप्रसंगी ते बोलत होते. मैत्रेयच्या संपादिका जयश्री देसाई, सुनील महाजन, प्रकाश पायगुडे, वैभव वझे, शोभना मोघे, निकिता मोघे या वेळी उपस्थित होते.
डॉ. पटेल म्हणाले, ‘‘समाज कळायला सच्चे माणूसपण असावे लागते. हे माणूसपण असलेल्याशिवाय सच्चा नट तयार होत नाही. मोघे हे सच्चे नट आहेत. ते त्या काळातील फक्त नाटकच नाही, तर चित्रपट आणि साहित्य चळवळीचे साक्षीदार आहेत. ‘नटरंगी रंगले’ या त्यांच्या आत्मचरित्रात त्या संपूर्ण काळाचा आलेख मांडला आहे. यामध्ये फक्त त्यांनी नाटकात केलेल्या भूमिकांची माहिती नाही, तर त्यामागील प्रत्येक घटनेचा सुरेख आढावा घेतला आहे.’’(प्रतिनिधी)
रुग्णसेवेसाठी अभिनय सोडला
रुग्णसेवेसाठी अभिनय सोडल्याचे सांगताना डॉ. जब्बार पटेल म्हणाले, ‘‘त्या वेळी मी नुकतीच प्रॅक्टीस सुरू केली होती. नाटकाचे प्रयोग शनिवार-रविवारीच असतात. रविवारी दौंडचा बाजार असायचा त्यामुळे त्या भागातील लोक दवाखान्यात यायचे. मी जर प्रयोगानिमित्त बाहेरगावी असलो तर रुग्णांना परत जावे लागे. त्या वेळी दळणवळणाची साधनेही फारशी नव्हती. आपल्या अभिनयामुळे रुग्णांना त्रास नको म्हणून मी अभिनय बंद करून फक्त दिग्दर्शनाकडे वळण्याचा निर्णय घेतला. कारण, दिग्दर्शकाला प्रयोगासाठी बहेरगावी जावे लागायचे नाही. नंतर सिनेमातही अभिनयाचा मोह टाळला.’’