कला ही मुक्तच हवी
By Admin | Updated: January 25, 2017 02:14 IST2017-01-25T02:14:31+5:302017-01-25T02:14:31+5:30
कलेला बंधनं न घालता ती मुक्त, स्वच्छंदी असायला हवी, असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट यांनी व्यक्त केले.

कला ही मुक्तच हवी
पुणे : कलेला बंधनं न घालता ती मुक्त, स्वच्छंदी असायला हवी, असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट यांनी व्यक्त केले. पिकासोतर्फे आयोजित केलेल्या पाचव्या कलाप्रदर्शनाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले त्या वेळी ते बोलत होते. या वेळी सामाजिक कार्यकर्त्या दीपा देशमुख, सुषमा निम्हण, मिलिंद मिसाव व सचिन वाणी उपस्थित होते.
प्र्रत्येकाला चंद्र, सूर्य, निसर्ग जसा दिसतो तसा त्याने काढावा. चित्र काढताना कुणाचे अनुकरण करू नये असेही ते आपल्या मनोगतात म्हणाले. चित्रकारांचे चरित्र लिहिण्यासाठी चित्रकलेचा अभ्यास करत असताना, एखाद्याला निसर्गात जाऊन चित्र काढावेसे वाटते तर कोणाला बंदिस्त जागेत चित्र काढावेसे वाटते. त्यामुळे चित्र काढताना प्रत्येकाचा दृष्टिकोन हा वेगळा असतो. या प्रदर्शनातील चित्रे पाहून लहान मुलांमधील कलेची प्रचिती आली. त्यांच्या गुरूंनीही त्यांना योग्य मार्गदर्शन केले आहे. या प्रदर्शनात विविध प्रकारची ४ ते ८६ वयोगटातील कलाकारांनी काढलेली चित्रे व आर्टवर्क आहेत. बाटलीवर केलेले पेंटिंग नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. या बरोबरच अबस्ट्रॅक्ट, शिल्पकला, व्यक्तिचित्रे, पोट्रेट, पेन्सिल आर्ट अशा विविध प्रकारांतील चित्रे या प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत. आपल्या पाल्याने काढलेल्या चित्रासोबत पालक या कार्यक्रमात आवर्जून फोटो काढत होते. आपल्या पाल्याची कला पाहताना पालकांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहात होता. आपलं चित्रं प्रदर्शनात पाहून लहानगेही खूष होत होते. आपल्या सवंगड्यांना आवर्जून आपले चित्र दाखवत होते.
या कार्यक्रमात विविध चित्रप्रकारात उत्कृष्ट ठरलेल्या विद्यार्थ्यांना अवचट यांच्या हस्ते पारितोषिकेही देण्यात आली. हे प्रदर्शन २६ जानेवारीपर्यंत बालगंधर्व कला दालनात सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत सर्वांना पाहण्यास खुले आहे.
(प्रतिनिधी)