जल्लोषात बाप्पांचे आगमन

By Admin | Updated: September 18, 2015 01:10 IST2015-09-18T01:10:55+5:302015-09-18T01:10:55+5:30

बाप्पाची आतुरतेने वाट पाहणारे गणेशभक्त... त्याच्या आगमनासाठी त्यांनी केलेली जय्यत तयारी... बाप्पाला घरी आणताना ‘गणपती बाप्पा मोरया’चा होणारा जयघोष

The arrival of Bappa in the show | जल्लोषात बाप्पांचे आगमन

जल्लोषात बाप्पांचे आगमन

पुणे : बाप्पाची आतुरतेने वाट पाहणारे गणेशभक्त... त्याच्या आगमनासाठी त्यांनी केलेली जय्यत तयारी... बाप्पाला घरी आणताना ‘गणपती बाप्पा मोरया’चा होणारा जयघोष आणि अखेर आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन झाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद... हे चित्र आज जिल्ह्यात ठिकठिकाणी पाहायला मिळाले.
यंदा गणेशोत्सवावर दुष्काळाचे सावट आहे. या परिस्थितीमुळे सर्वांचा आवडता असणारा हा उत्सव किती उत्साहात साजरा होईल याबाबत साशंकता होती. परंतु मागील आठवड्यात पावसाने हजेरी लावल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला आणि बाप्पाला पाऊस पाडण्याचे साकडे घालतच त्याचे स्वागत करण्यात आले.
अतिशय चैतन्यपूर्ण वातावरणात, ढोल-ताशांच्या गजरात आणि थाटात आज बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली. संपूर्ण शहर ढोल-ताशाच्या गजराने दुमदुमत होते. सार्वजनिक गणेशमंडळांमध्येही सकाळपासूनच मिरवणुकीची गडबड चालू होती.
यामुळे मागील अनेक दिवसांपासून बाप्पाची असलेली प्रतीक्षा आज अखेर संपली. पुढील दहा दिवसांसाठी आपल्यासोबत असणाऱ्या बाप्पासाठी मंडळांतर्फे आकर्षक अशी सजावट करण्यात आली होती.
पुण्यात मानाच्या गणपतींबरोबरच पुण्याचेच नाही तर संपूर्ण राज्याचे आराध्यदैवत असलेल्या दगडूशेठ गणपतीचीही अतिशय दिमाखात स्थापना करण्यात आली.
याबरोबरच मंडई, बाबूगेनु तरुण मंडळ आणि भाऊ रंगारी या गणपतींच्या मिरवणुका निघाल्या होत्या. ढोल-ताशाच्या गजराने आसमंत दुमदुमला होता तर सनईच्या सुरांनी वातावरण मंगलमय झाले होते. (प्रतिनिधी)

दुष्काळाची परिस्थिती राज्यात निर्माण झाली असली तरी परतीचा मॉन्सून चांगला होईल, अशी आशा आहे़ सध्या दुष्काळाकडेच जास्त लक्ष देणार आहे़ पुण्यातील गणेशोत्सव मंडळांनी सामाजिक भान राखत गणेशोत्सव साजरा करण्याचे ठरविले आहे़ इतर मंडळांनीही प्रेरणा घेऊन आपली सामाजिक बांधिलकी जपावी़
- गिरीश बापट, पालकमंत्री

Web Title: The arrival of Bappa in the show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.