किरकोळ वादातून घरावर सशस्त्र हल्ला
By Admin | Updated: August 18, 2014 05:15 IST2014-08-18T05:15:47+5:302014-08-18T05:15:47+5:30
दौंड तालुका खरेदी-विक्री संघाचे माजी अध्यक्ष दादासाहेब शितोळे यांच्या कुसेगाव (ता. दौंड) येथील राहत्या घरावर सशस्त्र हल्ला करून चौघांना जखमी करण्यात आले

किरकोळ वादातून घरावर सशस्त्र हल्ला
पाटस : दौंड तालुका खरेदी-विक्री संघाचे माजी अध्यक्ष दादासाहेब शितोळे यांच्या कुसेगाव (ता. दौंड) येथील राहत्या घरावर सशस्त्र हल्ला करून चौघांना जखमी करण्यात आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक एन. एम. सारंगकर यांनी दिली.
दादासाहेब शितोळे (वय ६0), अनिल शितोळे (वय ४५), अशोक शितोळे (वय ४0), मनीषा शितोळे (वय ३५ सर्व राहणार कुसेगाव, वागदरमळा) हे चौघे जखमी झाले आहे.
याप्रकरणी १0 व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुषार शितोळे, श्रीकांत शितोळे, नीलेश शितोळे, किरण शितोळे, महेश शितोळे, मच्छिंद्र शितोळे, सागर शितोळे, दिगंबर शितोळे, विशाल शितोळे (सर्व राहणार कुसेगाव, ता. दौंड), सोन्या (पूर्ण नाव समजले नाही. रा. देऊळगावगाडा, ता. दौंड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शुक्रवार (दि. १५) रोजी रात्री ११ वाजता आरोपींनी रस्त्यात मोटरसायकल आडवी लावली होती. या किरकोळ कारणावरून दोन्ही कुटुंबांतील व्यक्तींचा वाद झाला होता. त्यानंतर रात्री १ वाजता शितोळे यांच्या घराचा दरवाजा मच्छिंद्र याने वाजवला.
या वेळी दादासाहेब शितोळे यांनी दरवाजा उघडला. तेव्हा मच्छिंद्रने त्यांच्या कानावर काठीचा फटका मारल्याने ते जमिनीवर कोसळले. त्यानंतर अन्य बाकी मंडळी घरात घुसले आणि त्यांनी अनिल याच्या डाव्या पायावर कोयता मारला आणि डोक्यात काठी टाकली.
या वेळी जखमीच्या मदतीला त्यांचा भाऊ अशोक आणि भावजयी मनीषा सोडवायला गेले असता अशोक यांच्या मानेवर लोखंडी पाइप मारला, तर मनीषा यांच्या हातावर काठी मारली.
हा सर्व प्रकार सुरू असताना जोराचा आरडाओरडा झाला तेव्हा परिसरातील ग्रामस्थ मदतीला धावून आले; मात्र आरोपी पळून गेले होते. घटनेचे वृत्त पोलिसांना कळताच या वेळी पोलीस निरीक्षक एन. एम. सारंगकर, फौजदार एस. एम. जाधव, सुनील वाणी, केशव जगताप, मारुती सुळ, रोकडे अप्पा घटनास्थळी गेले आणि परिस्थितीची पाहणी करून आरोपींचा शोध घेतला; मात्र आरोपी फरार झाले होते. (वार्ताहर)