दूध भुकटी प्रकल्पासह विविध विषयांना मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:19 IST2021-02-21T04:19:24+5:302021-02-21T04:19:24+5:30
बारामती : बारामती तालुका दूध उत्पादक संघाच्या सर्वसाधारण सभेत संघाच्या २० मे. टन क्षमतेच्या दूध भुकटी प्रकल्पाला मंजुरी देत ...

दूध भुकटी प्रकल्पासह विविध विषयांना मंजुरी
बारामती : बारामती तालुका दूध उत्पादक संघाच्या सर्वसाधारण सभेत संघाच्या २० मे. टन क्षमतेच्या दूध भुकटी प्रकल्पाला मंजुरी देत विविध विषयांना मंजुरी देण्यात आली. बारामती तालुका दूध उत्पादक संघाची ४३ वी सर्वसाधारण सभा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत खेळीमेळीत पार पडली.
यावेळी बारामती दूध संघाचे चेअरम संदीप जगताप, बारामतीच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे, नगरपरिषदेचे गटनेते सचिन सातव, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष संभाजी होळकर, सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे, दूध संघाचे कार्यकारी संचालक डॉ. सचिन ढोपे आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, कोरोना संकटकाळात दूध धंद्यात प्रचंड अडचणी आल्या. राज्य शासनाने दूधउत्पादक शेतकऱ्यांचे दूध २५ रुपये प्रतिलिटरने घेतले. त्यासाठी ३०० कोटींची रक्कम खर्च केली. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. कोरोना संकटात शेतकऱ्यांकडून घेतलेल्या दुधाची राज्य शासनाने दूध भुकटी तयार केली आहे. त्या काळात याचा ताळमेळ बसत नव्हता. मात्र,या भुकटीला २७५ कोटींची रक्कम मिळणार आहे. सुदैवाने भुकटीला भाव वाढल्याने हे पैसे मिळणार आहेत. शिवाय बटर आदींचे वेगळेच पैसे मिळतील. जाणकार मंडळी प्रशासनात असल्याने हे शक्य झाल्याचे पवार म्हणाले.
खासगी दूध संघ शेतकऱ्यांना दुधाला भाव असल्यावरच चांगला दर देतात.मात्र, दुधाची मागणी घटल्यावर शेतकऱ्यांना दर दिला जात नाही. मात्र, बारामती दूध संघाने कोणत्याही परीस्थितीत २५ रुपये प्रतिलिटरच्या आत दर दिला नाही. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना अडचणीच्या काळातदेखील खासगीच्या तुलनेने अधिकचे पैसे मिळाल्याचे पवार म्हणाले.
बारामती दूध संघ नंदन पशुखाद्याच्या बळावर शेतकऱ्यांना चांगला दर देत आहे. दूध संघाने दुधाच्या पाऊचची विक्री वाढवावी. त्यातून आणखी चांगला दर देणे शक्य होईल, अशी सूचना पवार यांनी केली. बारामतीत देशी गायींसह चांगल्या म्हशींचे संगोपनाबाबत देशात पथदर्शी असा प्रकल्प उभा राहत आहे. दूध उत्पादनाबाबत नवीन प्रयोग येथे सुरू आहेत. येथे सुरू असलेल्या नवीन प्रयोगामुुळे ९२ टक्के कालवडीच जन्माला घालता येतील. त्यामुळे दूध धंदा अधिक फायद्याचा होईल.
बारामती दूध संघाचे चेअरमन संदीप जगताप म्हणाले, बारामती दूध संघाने २०१९—२० मध्ये २७.८३ रुपये सरासरी दर दिला आहे. शासनाचा दर २५ रुपये असून देखील बारामती संघाने २.८३ रुपये प्रतिलिटर अधिक दर दिला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेवरून सुरू केलेल्या चारा छावण्यांमुळे दुष्काळात दूध धंदा तरला. दूधसंघाने यावर्षी कोणतेही कर्ज घेतलेले नाही. तसेच संघाचा यंदा २३.१५ कोटी रुपये वार्षिक नफा आहे. दूध संघाच्या वतीने २० मे टन क्षमतेचा दूध भुकटी प्रकल्प करण्यात येत आहे. त्यामुळे शेतक-यांना चांगला दर देण्यासाठी याचा अधिक उपयोग होईल, असे जगताप यांनी सांगितले.
जिरायती भागातील दुष्काळ कायमचा पुसला जाईल
प्रत्येक निवडणुकीत बारामतीत विरोधकांच्या निशाणा येथील जिरायती भागाच्या पाणीप्रश्नावर असतो. हा प्रश्न कायमचा निकाली काढण्याचे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दूध संघाच्या सभेत दिले. यावेळी पवार म्हणाले. राज्य शासनाच्या माध्यमातून नीरा डावा कालव्यावर मोठी पाणीपुरवठा योजना करण्याचा प्रयत्न आहे. सुमारे ३२५ कोटींची ही योजना आहे,ती यशस्वी ठरल्यास जिरायती भागातील दुष्काळ कायमचा पुसला जाईल, असे पवार म्हणाले.