मंडपांसाठीच्या नव्या नियमावलीला मंजुरी
By Admin | Updated: September 19, 2015 04:44 IST2015-09-19T04:44:14+5:302015-09-19T04:44:14+5:30
उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार पुणे महापालिकेच्या वतीने मंडपांसाठी तयार करण्यात आलेल्या नव्या नियमावलीस मुख्य सभेने शुक्रवारी मंजुरी दिली.

मंडपांसाठीच्या नव्या नियमावलीला मंजुरी
पुणे : उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार पुणे महापालिकेच्या वतीने मंडपांसाठी तयार करण्यात आलेल्या नव्या नियमावलीस मुख्य सभेने शुक्रवारी मंजुरी दिली. मंडपासाठी रस्त्यावर खड्डा खोदल्यास दंडात्मक कारवाई, परवानगीसाठी ५ दिवस अगोदर अर्ज करणे, जाहिरात फलकासाठी परवाना शुल्क भरणे आदी २१ शर्तींची नियमावली मंजूर करण्यात आली आहे. महापालिका प्रशासनाकडून शनिवारी ही नियमावली उच्च न्यायालयामध्ये सादर केली जाणार आहे.
रस्त्यांवर बेकायदेशीरपणे मंडप उभारून उत्सव साजरे केले जात असल्यामुळे वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळा होत असल्याबाबतची जनहित याचिका उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आली आहे. महापालिकांनी मंडपांबाबत एक धोरण ठरवून त्याबाबतची नियमावली तयार करावी, असे निर्देश उच्च न्यायालयाकडून देण्यात आले होते. त्यानुसार सर्वपक्षीय समिती स्थापन करून २१ शर्तींची नियमावली तयार करण्यात आली. अतिक्रमण निर्मूलन विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी त्याची माहिती सभागृहास दिली.
कोणताही सण, उत्सव, कार्यक्रम याकरिता रस्त्यावर मंडप उभारायचा असल्यास वाहतूक विभाग व स्थानिक पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांचे ना हरकत प्रमाणपत्रासह कार्यक्रमाच्या ५ दिवस अगोदर अर्ज करावा. अर्जामध्ये मंडपाची लांबी, उंची, नकाशा देण्यात यावा. मंडपाची उंची ४० फुटांपेक्षा जास्त नसावी, आवाजाची मर्यादा पाळावी, मंडपाच्या परवान्याची मुदत संपल्यानंतर ते ३ दिवसांच्या आत काढून टाकण्यात यावे. या नियमांचे पालन न केल्यास परवाना रद्द केला जाईल, असे नियमावलीमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.
(प्रतिनिधी)
पालिकेच्या उपक्रमांची जाहिरात बंधनकारक
गणेशोत्सव, नवरात्रोत्सव तसेच इतर उत्सवांमध्ये मंडळांकडून कमानी उभारून त्यावर जाहिराती लावल्या जातात. यापुढे या जाहिरातींच्या एक पंचमांश जागेमध्ये महापालिकेच्या उपक्रमाची जाहिरात मंडळांनी करावी, अशी उपसूचना महापालिकेच्या मुख्य सभेमध्ये मंजूर करण्यात आली. त्यामुळे यापुढे पालिका उपक्रमांची जाहिरात करणे मंडळांना बंधनकारक असणार आहे. त्याचबरोबर मंडळांना जाहिरात करण्यासाठी आकाशचिन्ह परवाना विभागाची रीतसर परवानगी घ्यावी लागणार आहे, त्याचबरोबर त्याचे परवाना शुल्कही जमा करावे लागणार असल्याचे नियमावलीमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.
रस्त्यावर मंडप टाकताना रस्त्यावर खड्डा खोदल्याचे आढळून आल्यास एका खड्ड्याला दोन हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. दंडात्मक कारवाईनंतर पुन्हा खड्डा खोदल्याचे निदर्शनास आल्यास फौजदारी कारवाई करण्यात येईल, असे नव्या नियमावलीमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.