कचऱ्यासाठी पर्यावरण व्यवस्थापक नियुक्त
By Admin | Updated: November 2, 2015 01:10 IST2015-11-02T01:10:38+5:302015-11-02T01:10:38+5:30
शहरातील कचरा प्रकल्पाचे व्यवस्थापन करण्यासाठी पर्यावरण व्यवस्थापकांची नियुक्ती करण्याचा निर्णय तांत्रिक समितीच्या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे.

कचऱ्यासाठी पर्यावरण व्यवस्थापक नियुक्त
पुणे : शहरातील कचरा प्रकल्पाचे व्यवस्थापन करण्यासाठी पर्यावरण व्यवस्थापकांची नियुक्ती करण्याचा निर्णय तांत्रिक समितीच्या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे. या कचरा प्रकल्पांच्या अडचणी सोडविण्यासाठी नारी संस्था तसेच नागपूर विद्यापीठातील आभियांत्रिकी संशोधन संस्थेची मदत घेतली जाणार आहे.
कचरा प्रकल्पांची समस्या सोडविण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीची बैठक नुकतीच झाली. या बैठकीला नागपूर विद्यापीठातील राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. अतुल वैद्य, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे डॉ. संजय कांबळे, डॉ. रजनीश कुमार, अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, घनकचरा व्यवस्थापन प्रमुख किशोरी गद्रे, तसेच स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते. कचरा प्रकल्पाच्या समस्येवर या वेळी चर्चा करून काही उपाययोजना सुचविण्यात आल्या.
महापालिकने शहरातील ओला व सुका कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी २ मोठे प्रकल्प व २१ बायोगॅस प्रकल्प उभारले आहेत. या प्रकल्पांमधून पूर्ण क्षमतेने कचऱ्यावर प्रक्रिया न होणे, दुर्गंधी येणे, वीजनिर्मितीमध्ये अडचणी येणे, वारंवार पाते खराब होणे, अशा समस्या निर्माण होतात. त्याबाबत बैठकीमध्ये चर्चा करून मार्गदर्शन करण्यात आले. पर्यावरण व्यवस्थापकांची नियुक्ती करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. कचरा प्रकल्पांच्या समस्येवर मात करण्यासाठी याची मोठी मदत प्रकल्पांना होऊ शकणार आहे.
उरुळी देवाची व फुरसुंगी येथील कचरा डेपोमध्ये कचरा टाकण्यास गावकऱ्यांकडून विरोध होत असल्याने शहरातील कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची हा प्रश्न निर्माण झाला आहे. यापार्श्वभूमीवर प्रभागातील कचरा प्रभागातच जिरवावा ही संकल्पना राबविण्यात येत आहे. त्याकरिता कचऱ्यावर प्रक्रिया करणारे छोटे-छोटे प्रकल्प उभारले जात आहेत.