नाभिक समाजाच्या मागण्या मार्गी लावू
By Admin | Updated: January 1, 2015 01:10 IST2015-01-01T01:10:14+5:302015-01-01T01:10:14+5:30
नवीन वर्षात नाभिक समाजाच्या मागण्यांबाबत कार्यवाही करू, असे आश्वासन देत लवकरच मुख्यमंत्र्यांसमवेत समाजाची बैठक घेऊ, असे आश्वासन सामाजिक न्याय व आदिवासी विकासमंत्री दिलीप कांबळे यांनी दिले.

नाभिक समाजाच्या मागण्या मार्गी लावू
पुणे : नवीन वर्षात नाभिक समाजाच्या मागण्यांबाबत कार्यवाही करू, असे आश्वासन देत लवकरच मुख्यमंत्र्यांसमवेत समाजाची बैठक घेऊ, असे आश्वासन सामाजिक न्याय व आदिवासी विकासमंत्री दिलीप कांबळे यांनी दिले.
नाभिक परिसर पुणे यांच्या वतीने सामेवारी कोथरूड येथे राज्यातील नाभिक समाजाचा वधू-वर मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याचे उद्घाटन कांबळे यांच्या हस्ते झाले. या वेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून स्वप्नील राऊत, संजय सूर्यवंशी, गजानन पंडित, राहुल पवार, सुरेश जगताप, राजेश गायकवाड, सुमनताई पवार, बाळासाहेब तावरे, सुधीर गवळी, विलास वाघ, दिनकर चौधरी आदी उपस्थित होते.
या वेळी समाजातील उत्कृष्ट कार्याबद्दल कांबळे यांच्या हस्ते अशोक शिंदे, गो. प. काशिद, शंकरराव श्रीमंगल, अशोक सरवसे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
समाजाच्या वतीने कांबळे यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. यात समाजाचा विशेष मागास प्रवर्गात समावेश करा, अॅट्रॉसिटी अॅक्टखाली संरक्षण, सलून व्यावसायिकांसाठी लोखंडी टपरी, मोफत आरोग्य सुविधा, पेन्शन योजना, सरकारी शॉपिंग सेंटरमध्ये राखीव गाळे आणि शूरवीर जीवा महाले यांचे स्मारक प्रतापगडावर बांधा आदी मागण्या करण्यात आल्या. या मागण्यांचे निवेदन यापूर्वीही समाजाच्या वतीने माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी दिले होते. दिलीप कांबळे यांनी या मागण्यांबाबत आपण २६ जानेवारी २0१५ पूर्वी कार्यवाही करू, असे सांगत लवकरच मागण्या पूर्ण करू, असे अश्वासन दिले. कांबळे यांनी या वेळी पुणे शहरात समाजाच्या सामाजिक उपक्रमासाठी १ एकर जागा पुढील सहा महिन्यांत देऊ, तसेच ग्रामीण भागातील सलून व्यावसायिकांना दहा बाय दहाची टपरी व्यवस्था करू, असेही अश्वासन दिले. नाभिक परिसर वधू-वर विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. (प्रतिनिधी)