धराडेताई महापौर झाल्याचे अप्रूप

By Admin | Updated: September 13, 2014 05:36 IST2014-09-13T05:36:36+5:302014-09-13T05:36:36+5:30

अरे बापरे केवढा हा इमला! ...अन् इथं तिसरा मजला कुठं हाय, शकुंतलाताई कवा भेटणार, अशी उत्सुकता नवनिर्वाचित महापौर शकुंतला धराडे

Appearance of Dharadatai mayor | धराडेताई महापौर झाल्याचे अप्रूप

धराडेताई महापौर झाल्याचे अप्रूप

पिंपरी : अरे बापरे केवढा हा इमला! ...अन् इथं तिसरा मजला कुठं हाय, शकुंतलाताई कवा भेटणार, अशी उत्सुकता नवनिर्वाचित महापौर शकुंतला धराडे यांच्या भेटीसाठी आतुर झालेल्या त्यांच्या सासर-माहेरकडील मंडळींना लागली होती. राज्यात विकासात आघाडीवर असलेल्या महापालिकेच्या महापौरपदावर विराजमान झालेल्या शकुंतलातार्इंबद्दल त्यांना कमालीचे अप्रूप असल्याचे त्यांच्या वागण्या-बोलण्यातून जाणवले.
पालिकेच्या तिसऱ्या मजल्यावर नेहमी स्टार्च कपड्यातील कार्यकर्त्यांचा वावर दिसून येतो. गुरुवारी मात्र साध्या कपड्यांतील खेडूत महिला, पुरुषांची गर्दी मोठ्या प्रमाणावर दिसून आली. धराडेताई महापौरपदाची सूत्रे स्वीकारणार असल्याने त्यांना सदिच्छा देण्यासाठी त्यांचे मूळ गाव अहमदनगर जिल्ह्यातील कोतुळ भांगेवाडी येथून ग्रामस्थ आले होते. अकोले तालुक्यातील अंभोळ या माहेरगावचे ग्रामस्थ, नातेवाईकही स्वतंत्र वाहने करून महापालिकेत आवर्जून हजर होते. महापौरपद, महापालिकेचा कारभार हाकण्याची जबाबदारी आपल्यातील एका महिलेला मिळाली, याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. गावाकडे ग्रामपंचायत सदस्य, फार तर सरपंच या पदापर्यंतच्या व्यक्तीला काय मान असतो, याची कल्पना असलेल्या या लोकांना महापौरपदाबद्दल फारशी माहिती नव्हती. ते कुतूहलाने महापालिका प्रशासकीय इमारत, महापौर कक्षाची पाहणी करीत होते. येणाऱ्या-जाणाऱ्याकडे विचारपूस करत होते. शहराशी फारसा संबंध नसलेले हे ग्रामस्थ काहीसे गोंधळलेले दिसत होते. महापौर निवडीनंतर सभागृहात भाषण सुरू होते, तर गावाहून आलेले नातेवाईक तार्इंना भेटण्यासाठी महापौर कक्षाबाहेर थांबले होते. बेस्ट सिटी असा लौकिक मिळविलेल्या शहराचा प्रथम नागरिक होण्याचा बहुमान मिळविलेली महिला आपल्यातीलच एक असल्याचे अप्रूप धराडे यांच्या माहेर आणि सासरच्या नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसत होते.
नवनिर्वाचित महापौर म्हणून धराडे सभागृहातून बाहेर पडताच गावाहून आलेल्या मंडळींनी जल्लोषही ग्रामीण ढंगातच केला. लाल
रंगाच्या गुलालाची उधळण करीत एकमेकांची गळाभेट घेतली. ‘‘आमची मेहुणी महापौर होणार म्हणून
गावाहून आलोय. त्यांचा कौतुक सोहळा पाहायचा आहे. मोठं पद मिळालंय. आनंद झाला,’’ अशी प्रतिक्रिया राहुरीहून आलेल्या सखाराम उंडे यांनी दिली.(प्रतिनिधी)

Web Title: Appearance of Dharadatai mayor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.