प्रतीकात्मक होळी करण्याचे आवाहन
By Admin | Updated: March 5, 2015 00:32 IST2015-03-05T00:32:15+5:302015-03-05T00:32:15+5:30
राज्याच्या वन विभागाने पर्यावरणाचा ऱ्हास होऊ न देता सर्वांनी प्रतीकात्मक पद्धतीने होळी साजरी करण्याचे आवाहन केले आहे.

प्रतीकात्मक होळी करण्याचे आवाहन
पुणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पर्यावरणपूरक होळी साजरी करण्याच्या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद देत राज्याच्या वन विभागाने पर्यावरणाचा ऱ्हास होऊ न देता सर्वांनी प्रतीकात्मक पद्धतीने होळी साजरी करण्याचे आवाहन केले आहे.
होळीसाठी हिरवी झाडे, लाकडे, शेण, गोवऱ्या या माध्यमातून होळी तयार करून ती जाळण्यात येते, यामध्ये नैवेद्य म्हणून टाकण्यात येणारे खाद्यान्न जळून नष्ट तर होतेच; परंतु ज्वलनातून पर्यावरणाचीदेखील हानी होते. या गोष्टी टाळण्यासाठी ज्या गावात संयुक्त वन व्यवस्थापन समिती कार्यरत आहेत, अशा भागांमध्ये प्रतीकात्मक होळी साजरी करण्याच्या सूचना वनविभागाकडून देण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)
घोषणा द्या...
स्त्रीसन्मानाच्या
कोणीही लाकूड जाळून होळी साजरू करू नये. गावातील कचरा गोळा करून किंवा भ्रष्टाचार, व्यसन आदी दुर्गुणांचा एकत्रित पुतळा तयार करून त्याला जाळून प्रतीकात्मक पद्धतीने होळी साजरी केली जावी. गावातील शाळांनाही सहभागी करून घेण्यात यावे. शालेय परिसर श्रमदानाने साफ करणे व त्यातील कोरडा कचरा काढून होळी करणे. होळीच्या वेळी ज्या बोंबा मारल्या जातात, त्याला पर्याय म्हणून जागतिक महिलादिन आणि सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त स्त्रीसन्मानाच्या घोषणा देणे आदी सूचनांचा समावेश असल्याची माहिती वनविभागातर्फे देण्यात आली आहे.