अप्पा लोंढेच्या खुनामागे अनेकांचा खदखदणारा राग
By Admin | Updated: June 8, 2015 05:00 IST2015-06-08T05:00:55+5:302015-06-08T05:00:55+5:30
जबरदस्त राजकीय वरदहस्त लाभलेल्या कुख्यात अप्पा ऊर्फ प्रकाश हरिभाऊ लोंढे (वय ५५, रा. उरुळी कांचन) याच्या खुनामागील कारणांचे एक एक पदर उलगडत चालले आहेत.

अप्पा लोंढेच्या खुनामागे अनेकांचा खदखदणारा राग
लक्ष्मण मोरे, पुणे
हातभट्टीवाला, वाळू माफिया, लँड माफिया आणि जबरदस्त राजकीय वरदहस्त लाभलेल्या कुख्यात अप्पा ऊर्फ प्रकाश हरिभाऊ लोंढे (वय ५५, रा. उरुळी कांचन) याच्या खुनामागील कारणांचे एक एक पदर उलगडत चालले आहेत. लोंढे याने गेल्या अनेक वर्षात केलेल्या अन्यायामध्ये भरडल्या गेलेल्यांच्या खदखदणाऱ्या रागामधून हा खून झाल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले असून, सहा महिन्यांपासून या हल्ल्याचा कट शिजत होता.
ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राम जाधव यांच्या पथकाने संतोष शिंदे, निलेश सोलवणकर, राजेंद्र गायकवाड, आकाश महाडीक, नितीन मोगल, विष्णु जाधव, नागेश झाडकर या सात जणांना आतापर्यंत अटक केली आहे. पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या तपासामध्ये लोंढेवर आकाश महाडीक, संतोष शिंदे, विष्णू जाधव यांचा प्रचंड राग होता असे निष्पन्न झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे याच्या वडीलांच्या नावावर उरुळी कांचन येथे असलेल्या तेरा एकर जमिनीपैकी आठ एकर जमिनीचा व्यवहार करुन प्रत्यक्षात मात्र तेरा एकर जमिनीचा ताबा घेतला होता. वडीलोपार्जित असलेली हक्काची जमीन गमवावी लागल्याचा राग संतोषच्या मनात अनेक वर्ष खदखदत होता.
तर आकाश महाडीक याचा चुलता आप्पा लोंढेसोबत असायचा. महाडीक कुटुंबाच्या मालकीच्या एकूण आठ एकर जमिनीपैकी निम्मा वाटा आपल्याला मिळावा या मागणीला आकाशचा चुलता दाद देत नव्हता. आकाश आणि त्याच्या आईने त्यांच्या चार एकर जमिनीचे कुलमुखत्यार पत्र विष्णू जाधव याच्यानावाने करुन दिले होते. विष्णू जाधव हा आप्पा लोंढेचा भाऊ विलास हरीभाऊ लोंढे याच्या खुनातील आरोपी आहे. त्यातूनच आकाश जाधवसोबत गेला. यासोबतच निलेश सोलवणकर हा कर्जबाजारी झालेला होता तर नागेश झाडकर याला गुन्हेगारीत नाव आणि पैसा हवा होता.
आप्पाचा भाऊ विलास लोंढे याच्या खुनामध्ये गोरख कानकाटे, अण्णा ऊर्फ बबड्या गवारी, प्रमोद ऊर्फ बापू कांचन, सोमनाथ कांचन, रविंद्र गायकवाड, प्रवीण कुंजीर, विकास यादव यांना सत्र न्यायालयाने शिक्षा सुनावली होती. उच्च न्यायालयामधून जामिनावर सुटलेल्या आरोपींचा जामीन रद्द करण्साठी तसेच हा खटला लवकर सुरु करण्यासाठी लोंढेचे प्रयत्न सुरु होते. येत्या १५ जुनला तारीख होती. त्यामुळे आप्पा लोंढेचा काटा काढण्याचे विचार कानकाटे टोळीच्या डोक्यात होते. त्यानुसार टोळीने दुखावल्या गेलेल्या सर्वांना एकत्र केले.
सहा महिन्यांपासून मागावर
लोंढे दररोज पहाटे व्यायामाला बाहेर पडतो याची माहिती आरोपींनी काढली होती. सहा महिन्यांपासून त्याच्यावर हल्ला करण्याचा आरोपी प्रयत्न करीत होते. चार वेळा तो जाळ्यात आलेला असतानाही आरोपींना लोंढेवर हल्ला करता आला नव्हता. २८ मे रोजी पहाटे लोंढे कॅनॉल रस्त्याने जात असताना अर्ध्या वाटेमधूनच परत आला. तो शिंदवणे रस्त्यावरुन जात असतानाच आरोपींनी त्याला गाठले. लोंढेच्या येण्यापूर्वी अर्धा तास आधीच आरोपी घटनास्थळी आलेले होते.
1२८ मे रोजी पहाटे व्यायामासाठी घराबाहेर पडलेल्या लोंढेवर जाधव आणि झाडकर यांनी गोळ्या झाडल्या. तर सोलवनकर आणि शिंदे यांनी कोयत्याने वार केले. त्यावेळी गायकवाड सगळीकडे ‘वॉच’ ठेवून होता. खून केल्यावर पसार झालेल्या आरोपींना पोलीस निरीक्षक राम जाधव आणि त्यांच्या पथकाने शिताफीने अटक केली.
2आठ खून, खुनाच्या प्रयत्नाचे तीन गुन्हे, खंडणीचे सोळा गुन्हे, बेकायदा शस्त्र बाळगल्याचे अकरा गुन्हे, सहा वेळा चॅप्टर केसेस, पाच वेळा तडीपारी, चार गुन्ह्यांमध्ये शिक्षा असा गुन्हेगारीचा आलेख असलेल्या अप्पा लोंढेच्या खुनामागे असलेली आणखी कारणे समोर येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.