‘लो वॉटर झोन’बाबत ‘कही खुशी, कही गम’

By Admin | Updated: January 26, 2015 01:49 IST2015-01-26T01:49:19+5:302015-01-26T01:49:19+5:30

एका बाजूला नागरिकांना नियमानुसार घरांचे बांधकाम करता येईल, यासाठी महापालिकेकडून नवीन बांधकाम नियमावली तयार करण्याचे काम सुरू आहे

'Any pleasure about' Low Water Zone ', Kahi Gum' | ‘लो वॉटर झोन’बाबत ‘कही खुशी, कही गम’

‘लो वॉटर झोन’बाबत ‘कही खुशी, कही गम’

हणमंत पाटील, पुणे
एका बाजूला नागरिकांना नियमानुसार घरांचे बांधकाम करता येईल, यासाठी महापालिकेकडून नवीन बांधकाम नियमावली तयार करण्याचे काम सुरू आहे. त्याच वेळी प्रारूप विकास आराखड्यातील आणखी एक गोंधळ समोर आला आहे. धनकवडी परिसरातील ‘पाणी कमतरता विभागा’चे (लो वॉटर झोन) आरक्षण उठविताना केवळ सर्व्हे क्रमांक ४, ५ व ६ वगळण्यात आले. प्रशासनाच्या ‘प्रिंटिंग मिस्टेक’मुळे एकाच भागातील नागरिकांना वेगवेगळा न्याय देण्यात आल्याचा गंभीर प्रकार उजेडात आला आहे.
शहराच्या १९८७ चा जुन्या हद्दीचा विकास आराखडा आणि समाविष्ट २३ गावांच्या नवीन विकास आराखड्यातील डोंगर उताराच्या भागात पूर्वी टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. त्यामुळे या भागातील लोकसंख्या व बांधकामावर नियंत्रण आणण्यासाठी डोंगर उताराच्या भागात ‘लो वॉटर झोन’ म्हणून ०.३३ चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) बांधकामाला परवानगी होती. मात्र, काही वर्षांतच तळजाई मंदिरालगत लाखो लिटर पाणीपुरवठा टाकी उभारण्यात आली. त्यामुळे पूर्वीच्या टेकडी व उताराच्या परिसरात पुरेसा पाणीपुरवठा होऊ लागला. त्यामुळे या भागात लोकवस्ती वाढत गेली. मात्र, बांधकामावर नियंत्रण असल्याने राजकीय वरदहस्ताने अनधिकृत बांधकामाकडे कल वाढला. त्यामुळे धनकवडी, आंबेगाव व तळजाई परिसर अनधिकृत बांधकामासाठी कुप्रसिद्ध झाला. मात्र, त्याचे मूळ असलेल्या ‘लो वॉटर झोन’च्या समस्येकडे दुर्लक्ष झाले.
दरम्यान, जुन्या हद्दीचा प्रारूप आराखडा तयार करताना आणि समाविष्ट गावांचा विकास आराखडा मंजूर करताना स्थानिक नागरिकांनी पाण्याची पुरेशी सुविधा झाल्याने ‘लो वॉटर झोन’ उठविण्याची मागणी केली. त्यानंतर दोन्ही विकास आराखडे मंजूर झाले. त्या वेळी केवळ सखल व मैदानी भागातील सर्व्हे क्रमांक ४,५ व ६ वगळता याच भागाच्या आजूबाजूला असणाऱ्या सर्व्हे क्रमांक ३, ७, ८, १० व ११ येथील डोंगर उताराचे ‘लो वॉटर’चे आरक्षण उठविण्यात आले. त्यामुळे याप्रकरणात काही तरी राजकारण झाले असून, पक्षपातीपणा करण्यात आल्याचा प्रश्न प्रभाग क्रमांक ६९ मधील ‘लोकमत आपल्या दारी’ या कार्यक्रमात उपस्थित करण्यात आला होता. त्याविषयाचा पाठपुरावा करून माहिती घेतली असता, प्रारुप विकास आराखड्यातील ‘प्रिंटिंग मिस्टेक’मुळे हा गोंधळ झाल्याचे उजेडात आले आहे. त्यावर धनकवडी येथील राजीव देशपांडे व उदय कुलकर्णी यांनी हरकती नोंदविल्या आहेत.

Web Title: 'Any pleasure about' Low Water Zone ', Kahi Gum'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.