ढगाळ हवामानामुळे रब्बी पिकांना चिंता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:27 IST2020-12-13T04:27:26+5:302020-12-13T04:27:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : अतीवृष्टीमुळे राज्याच्या काही भागाचे खरीप पिकांचे नुकसान झाले. आता पाण्याच्या उपलब्धतेमुळे रब्बी हंगाम चांगला ...

ढगाळ हवामानामुळे रब्बी पिकांना चिंता
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : अतीवृष्टीमुळे राज्याच्या काही भागाचे खरीप पिकांचे नुकसान झाले. आता पाण्याच्या उपलब्धतेमुळे रब्बी हंगाम चांगला जाण्याची चिन्हे असताना ढगाळ हवामानाचे संकट आले आहे. राज्यातील ७२ टक्के रब्बी पेरण्या पूर्ण झाल्या असून पिकांची उगवणही झाली आहे.
ढगाळ हवामान फार दिवस टिकले तर उगवून आलेल्या पिकांना किड-रोगांचा धोका असल्याचे शेतीतज्ज्ञांचे म्हणणे आहे. राज्याचे रब्बी क्षेत्र सरासरी ५१ लाख २० हजार हेक्टर आहे. यातील ३७ लाख २ हजार १०१ हेक्टर क्षेत्रावरील पेरण्या झाल्या आहेत. यात सर्वाधिक २० लाख २७ हजार हेक्टर क्षेत्र ज्वारीचे असते. यंदा १३ लाख ९५ हजार हेक्टर क्षेत्रावर ज्वारीची पेरणी झाली आहे. गव्हाचे क्षेत्र ८ लाख ७५ हजार हेक्टर आहे. त्यापैकी ४ लाख ८१ हजार हेक्टरवर पेर झाली आहे. अनेक ठिकाणी अजून पेरणीपूर्व मशगातीची कामे सुरू आहेत.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात बहुतांश ठिकाणी ढगाळ हवामान आहे. थंडी गायब झाली आहे. हे हवामान नव्याने उगवून आलेल्या पिकांवरील किड-रोगांंसाठी पोषक असते. मका व ज्वारीच्या पिकावर आताच काही ठिकाणी लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसतो आहे. तसेच हरभऱ्यात घाटे अळी आणि मर रोग आढळून आला आहे. हे हवामान फार काळ टिकणार नाही. उन्हाची सुरुवात झाल्यानंतर पिकांसाठी ते अनुकूल ठरेल, असे कृषी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.