बारामतीत भाजीविक्रेत्यांची अँटिजन चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:14 IST2021-06-16T04:14:00+5:302021-06-16T04:14:00+5:30
१०० चाचण्यांमध्ये एकही संक्रमीत रूग्ण नाही बारामती : शहरात पुन्हा कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रशासन अॅक्शनमोडवर ...

बारामतीत भाजीविक्रेत्यांची अँटिजन चाचणी
१०० चाचण्यांमध्ये
एकही संक्रमीत रूग्ण नाही
बारामती : शहरात पुन्हा कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रशासन अॅक्शनमोडवर आले आहे. मंगळवारी (दि.१५) शहरातील सर्वात मोठ्या श्री गणेश भाजी मंडई येथील सर्व भाजीविक्रेते व फळविक्रेत्यांच्या अँटिजन चाचण्या करण्यात आल्या. यावेळी १०० जणांच्या चाचण्या करण्यात आल्या. सर्व अहवाल निगेटिव्ह आले. मंडईमध्ये अनेक ठिकाणी येथील व्यापारी व ग्राहक तोंडाला मास्क न लावता खरेदी व विक्री करत असल्याने नागरिकांचा हलगर्जीपणा कायम असल्याचे चित्र आहे.
बारामती शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या श्री गणेश भाजी मंडई हे गर्दीचे ठिकाण असून शहर व तालुक्यातील लोक येथे भाजी खरेदी व विक्रीसाठी येत असल्याने बारामती नगर परिषद अतिक्रमण विभाग व पंचायत समिती आरोग्य विभागाने संयुक्तपणे अँटिजन तपासणी करण्यात आल्या. यामध्ये महिलांची संख्या जास्त आहे. केलेल्या सर्व तापसण्यांमध्ये एकही कोरोना बाधित आढळून आला नाही. मात्र, एकीकडे प्रशासनाकडून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. तर दुसरीकडे मार्गदर्शक सूचनांना अनेक व्यापारी, विक्रेते, ग्राहक हरताळ फासताना दिसत आहेत. शहरामध्ये प्रशासनाकडून विना मास्क सापडल्यास दंडात्मक कारवाई केली जाते तरी देखील नागरिक नियमांचे उल्लंघन करत असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. बारामती शहरात प्रशासन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व्यापाऱ्यांच्या दुकानात जाऊन तपासणी करत आहे.
-----------------------
फोटो ओळी : बारामती येथील भाजीविक्रेत्यांची अँटिजन तपासणी करताना नगर परिषदेचे कर्मचारी.
१५०६२०२१-बारामती-०७