जुन्नरमध्ये आणखी एक बिबट्या जेरबंद

By Admin | Updated: June 13, 2015 04:37 IST2015-06-13T04:37:42+5:302015-06-13T04:37:42+5:30

जुन्नर तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात पिंपळगाव जोगा, भोईरवाडी, वीरशेटदरा या परिसरात लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात आज (दि. १२) पहाटे पाच वाजता बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले.

Another leopard in Junnar, Zeraband | जुन्नरमध्ये आणखी एक बिबट्या जेरबंद

जुन्नरमध्ये आणखी एक बिबट्या जेरबंद

मढ : जुन्नर तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात पिंपळगाव जोगा, भोईरवाडी, वीरशेटदरा या परिसरात लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात आज (दि. १२) पहाटे पाच वाजता बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले.
ओतूरचे वनक्षेत्रपाल सचिन रघतवान यांनी दिलेली माहिती अशी, की पिंपळगाव जोगा परिसरातील भोईरवाडी येथे २६ मे रोजी बिबट्याने घरापासून सखुबाई नानाभाऊ हिले (वय ६०) या महिलेला हल्ला करून घरापासून फरफटत ५०० मीटर अंतरावर जंगलात नेऊन ठार केले होते. त्यानंतर वनविभागाने या परिसरात पाहणी करून पाच पिंजरे लावले होते. पथकांकडून नियमित गस्तही सुरू होती.
शुक्रवार (दि.१२) सखाराम पांडुरंग भोईर यांच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला. तेथे तैनात वनसेवक एल.एम. भांगले, सुभाष डामसे यांनी पाहिले व तत्काळ वरिष्ठांशी संपर्क साधला. त्यानंतर वनक्षेत्रपाल एस.एस. रघतवान यांनी घटनास्थळी भेट दिली. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांचे पथक ज्यामध्ये वनपाल एस.डी. वायभसे, सी.एस. कांबळे, वनरक्षक एस.जी. मोमिन, वनसेवक भरत पारधी, नाना जाधव, पी.एस. मुरादे, जी.आर. मेमाणे, गणपत केदार हेही घटनास्थळी हजर झाले. जेरबंद बिबट्याला माणिकडोह बिबट्या निवारण केंद्रात सुरक्षित पोहोचवण्यात आले. प्रथमदर्शनी ही मादी असून, अंदाजे चार वर्षे वयाची असावी, असे वनविभागाकडून सांगण्यात आले. या मादीबरोबरच वनविभागाकडून पिंजऱ्यात जेरबंद केलेल्या बिबट्यांची संख्या सहा झाली आहे. (वार्ताहर)

Web Title: Another leopard in Junnar, Zeraband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.