आणखी एक चिटफंड घोटाळा उघड
By Admin | Updated: June 23, 2016 02:06 IST2016-06-23T02:06:38+5:302016-06-23T02:06:38+5:30
गुंतवणूक करा, व्याजासह मोठ्या रकमेचा फायदा मिळवा, असे आमिष दाखवून दिल्लीस्थित एका चिटफंड कंपनीने पिंपरी-चिंचवड शहर परिसर ते पुण्याच्या विविध भागांतील अनेक

आणखी एक चिटफंड घोटाळा उघड
पिंपरी : गुंतवणूक करा, व्याजासह मोठ्या रकमेचा फायदा मिळवा, असे आमिष दाखवून दिल्लीस्थित एका चिटफंड कंपनीने पिंपरी-चिंचवड शहर परिसर ते पुण्याच्या विविध भागांतील अनेक नागरिकांची फसवणूक केली आहे. मोरवाडीत आलिशान कार्यालय थाटून गुंतवणूकदारांकडून कोट्यवधी रुपये उकळून चिटफंडच्या संचालकांनी पोबारा केला आहे. जिल्ह्यात सुमारे दोन हजार एजंटांचे जाळे निर्माण करून हे नेटवर्क सुरू होते. अचानक कार्यालय बंद पडल्याने गुंतवणूकदार चिंताग्रस्त झाले आहेत.
मुदत संपल्यानंतरही मुद्दल आणि अन्य रक्कम न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे गुंतवणूकदारांच्या लक्षात आले. कार्यालय बंद झाले. संचालकांचा संपर्क तुटला. कार्यालयातील कोणाशीही संपर्क होत नसल्याने गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत. फसवणूक झाल्यानंतर काही गुंतवणूकदारांनी सामाजिक कार्यकर्ते सुनील शिंदे यांची भेट घेतली. त्यांच्याकडे फसवणूक झाल्याची कैफियत मांडली. फसवणुकीचे बळी ठरलेल्या गुंतवणूकदारांच्या वतीने शिंदे यांनी पुणे शहर पोलीस आयुक्तांकडे लेखी तक्रार दिली आहे.
संबंधित संस्थेचे प्रमुख कार्यालय दिल्ली येथे असून, तेथे जाऊन पुण्यातील एकाने फिर्याद दाखल केली आहे. पिंपरी पोलिसांकडे चिटफंड संस्थेच्या संचालकांविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
अवधूत चिटफंडच्या संचालकाविरोधातही गुन्हा दाखल झाला आहे. नागरिकांना कोट्यवधींचा गंडा घालून पोबारा करण्याचे प्रकार पिंपरी चिंचवडमध्ये सर्रासपणे घडत आहेत. (प्रतिनिधी)