आणखी एक लाचखोर जाळ्यात
By Admin | Updated: April 28, 2017 06:09 IST2017-04-28T05:55:56+5:302017-04-28T06:09:45+5:30
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मावळते आयुक्त दिनेश वाघमारे यांचे स्वीय सहायक राजेंद्र शिर्के यास २४ एप्रिलला १२ लाखांची

आणखी एक लाचखोर जाळ्यात
पिंपरी : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मावळते आयुक्त दिनेश वाघमारे यांचे स्वीय सहायक राजेंद्र शिर्के यास २४ एप्रिलला १२ लाखांची लाच घेताना पकडले. ही घटना ताजी असताना, अवघ्या दोन दिवसांत महापालिकेचा आणखी एक लाचखोर कर्मचारी जाळ्यात अडकला. उपद्रव शोध पथकात काम करणाऱ्या अजय अशोक सिन्नरकर या कर्मचाऱ्याला ११ हजारांची लाच घेताना गुरुवारी अटक केली.
सिन्नरकर हा महापालिकेच्या ‘अ’ क्षेत्रिय कार्यालयात उपद्रव शोध पथकात काम करतो. ‘अ’ क्षेत्रिय कार्यालय क्षेत्राच्या हद्दीत विनापरवाना लावलेल्या जाहिरात फलकांबाबत संबंधित जाहिरात एजन्सीच्या व्यक्तीस अलोसे यांच्यामार्फत सिन्नरकर याने बालावून घेतले. आपण विनापरवाना लावलेल्या जाहिरात फलकांसाठी आपल्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. ४० हजार रुपये दंड होईल. वरिष्ठांशी चर्चा करून फलकांची संख्या कमी दाखवून दंडाची रक्कम कमी करून देतो. ११ हजार रुपये द्या, अशी लाचेची मागणी सिन्नरकर याने तक्रारदाराकडे केली. जाहिरात एजन्सी चालविणाऱ्या व्यक्तीने याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे सिन्नरकर याची तक्रार दिली. या तक्रारीची दखल घेऊन गुरुवारी २७ एप्रिलला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचला. ही
कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शिरीष देशपांडे, कांचन जाधव, पोलीस निरीक्षक अरुण घोडके, पोलीस कॉन्स्टेबल मोरे, जगदाळे यांच्या पथकाने केली. (प्रतिनिधी)