बँक डेटा चोरी प्रकरणात आणखी एका आरोपीस गुजरातमधून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:10 IST2021-04-03T04:10:06+5:302021-04-03T04:10:06+5:30

पुणे : बँक डेटा चोरी प्रकरणाचे महत्त्वपूर्ण धागेदोरे पोलिसांच्या हाती लवकरच सापडण्याची शक्यता आहे. या प्रकरणात पुणे पोलिसांच्या सायबर ...

Another accused arrested in Gujarat in bank data theft case | बँक डेटा चोरी प्रकरणात आणखी एका आरोपीस गुजरातमधून अटक

बँक डेटा चोरी प्रकरणात आणखी एका आरोपीस गुजरातमधून अटक

पुणे : बँक डेटा चोरी प्रकरणाचे महत्त्वपूर्ण धागेदोरे पोलिसांच्या हाती लवकरच सापडण्याची शक्यता आहे. या प्रकरणात पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने आणखी एका आरोपीला गुजरातच्या वापीमधून अटक केली. पुण्यातील आरोपींना मोबाईल डेटा पुरविण्याचे काम संबंधित आरोपीने केल्याने न्यायालयाने आरोपीला दि. पाच एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

दिलीप लालजी सिंग (वय ३०, रा. वापी, गुजरात) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. यापूर्वी पोलिसांनी रविंद्र महादेव माशाळकर (वय ३४), आत्माराम हरिश्‍चंद्र कदम (वय ३४) मुकेश हरिश्‍चंद्र मोरे (वय ३७), राजशेखर यदैहा ममीडा (वय ३४), रोहन रवींद्र मंकणी (३७), विशाल धनंजय बेंद्रे (वय ४५), सुधीर शांतीलाल भटेवरा उर्फ जैन (वय ५४), राजेश मुन्नालाल शर्मा (वय ४२), परमजित सिंग संधू (४२), अनघा अनिल मोडक (वय ४०) यांच्यासह आणखी काही जणांना अटक केली होती.

आयसीआयसीय, एचडीएफसी व अन्य बॅंकांमधील नागरीकांच्या सक्रिय व निष्क्रिय बॅंक खात्यासंबंधीची गोपनीय माहिती आरोपींनी काही व्यक्तींच्या मदतीने बेकायदेशीर व अनधिकृतपणे चोरली होती. हीच गोपनीय माहिती पुण्यातीलच काही व्यक्तींना विक्री करण्यासाठी आल्यानंतर पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्यांना सोळा मार्च रोजी अटक केली होती. ग्राहकांच्या बँक खात्यामधील तब्बल सव्वा दोनशे कोटींची रक्कम आरोपी चोरी करणार होते, त्यापूर्वीच पोलिसांनी आरोपींना अटक केली होती. दरम्यान, या प्रकरणामध्ये आणखी काही जणांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी राज्याबाहेर जाऊन काही जणांना अटक केली होती. तसेच आणखी तपासही पोलिसांकडून सुरू होता.

या प्रकरणामध्ये आरोपींना मोबाईल डेटा पुरविण्याचे काम गुजरातमधील वापी येथील एकाने केल्याचे आरोपींच्या चौकशीत पुढे आले होते. त्यानुसार, पोलिस उपायुक्त भाग्यश्री नवटके, सहाय्यक पोलीस आयुक्त शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कुमार घाडगे यांचे पथक गुजरातमधील वापीमध्ये गेले होते. पोलिसांनी त्यास अटक केल्यानंतर न्यायालयासमोर हजर केले असता त्यास पाच एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

-----------------

Web Title: Another accused arrested in Gujarat in bank data theft case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.