‘लोकमत’ पत्रकारिता पुरस्काराच्या दुसऱ्या पर्वाची घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:19 IST2021-02-21T04:19:19+5:302021-02-21T04:19:19+5:30

पर्यावरण, शोधपत्रकारिता, नागरी प्रश्न, महिलांविषयक, छायाचित्रकार आदींसह प्रत्येकी २५ हजार रुपयांचे ७ पुरस्कार लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : मराठी ...

Announcement of the second edition of 'Lokmat' Journalism Award | ‘लोकमत’ पत्रकारिता पुरस्काराच्या दुसऱ्या पर्वाची घोषणा

‘लोकमत’ पत्रकारिता पुरस्काराच्या दुसऱ्या पर्वाची घोषणा

पर्यावरण, शोधपत्रकारिता, नागरी प्रश्न, महिलांविषयक, छायाचित्रकार आदींसह प्रत्येकी २५ हजार रुपयांचे ७ पुरस्कार

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : मराठी वृत्तपत्रसृष्टीत पहिल्याच वर्षी जोरदार स्वागत झालेल्या ‘लोकमत’ समूहाच्या ‘लोकमत’ पत्रकारिता पुरस्काराच्या दुसऱ्या पर्वाची घोषणा करण्यात आली आहे. पुण्यातील मराठी, इंग्रजी आणि हिंदी माध्यमांमध्ये कार्यरत पत्रकारांसाठी भरघोस रकमांचा हा सन्मान सोहळा पहिल्या वर्षीपासूनच प्रतिष्ठेचा ठरला आहे.

कोरोनाच्या काळात संपूर्ण शहर स्तब्ध झालेले असतानाही पत्रकार योद्ध्याप्रमाणे अविरत काम करत होते. लोकांना माहिती देण्याबरोबरच जनजागृती घडविण्याचे काम त्यांनी लेखणीद्वारे चालू ठेवले. कोरोना महामारीची तीव्रता कमी करण्यात पत्रकारांची भूमिका लक्षणीय आहे. अशा समाजाभिमूख पत्रकारितेविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच ‘लोकमत’ने यंदा दोन नव्या गटातील पुरस्कारांची घोषणा केली आहे. इतर गटांसोबतच ‘वर्क फ्रॉम होम’ या न्यू नॉर्मलमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या त्याचबरोबर कोरोनाच्या संकटकाळातही थेट फिल्डवर जाऊन वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांना विशेष पुरस्कार देण्यात येणार आहे. येत्या ५ मार्च २०२१ पर्यंत प्रवेशिका पाठविण्याची मुदत आहे.

शोधपत्रकारितेतून समाजाचा आरसा बनलेले, नागरी प्रश्नांना भिडून शहर विकासासाठी प्रयत्नशील असणाºया तसेच महिलांविषयक प्रश्न मांडून स्त्री सक्षमीकरणाची चळवळ पुढे नेणाऱ्या पुण्यातील पत्रकारांसाठी ‘लोकमत’तर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात येते.

समाजहितैषी पत्रकारितेला बळ मिळावे, हा ‘लोकमत’चा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. यामुळेच ‘लोकमत’तर्फे राज्यस्तरावर पां. वा. गाडगीळ आणि बाबा दळवी पुरस्कार देऊन राज्यभरातील पत्रकारांचा गौरव करण्यात येतो. याच मालिकेतील पुढचे पाऊल म्हणून पुण्यातील पत्रकारांसाठीही खास स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नऊ गटांत प्रत्येकी २५ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.

महिलांना सामाजिक प्रतिष्ठा, विकासाची संधी आणि निर्णयप्रक्रियेत त्यांचा सहभाग वाढावा, यासाठी त्यांची आणि समाजाचीही मनोभूमिका तयार करण्याचे काम ‘लोकमत’ करीत असते. त्यामुळेच महिलांविषयक लेखन करणा-या पत्रकारांनाही गौरविण्यात येणार आहे.

डिजिटल युगात वृत्तपत्राची आकर्षकता टिकविण्यात संपादन आणि मांडणीचे मोठे योगदान आहे. वर्तमानपत्रीय भाषेत ‘डेस्क’वरील म्हटल्या जाणा-या या सहकाऱ्यांचे काम पडद्यामागे राहते. यामुळेच उत्कृष्ट संपादन आणि मांडणी करणाऱ्या उपसंपादकांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. एक बोलके छायाचित्र हजार शब्दांपेक्षा अधिक प्रभावी ठरते. वृत्तपत्रीय छायाचित्रकार धावपळीतही क्षण टिपून समाजाला प्रत्यक्ष अनुभूती देतात. पुणे जिल्ह्यातील उत्कृष्ट छायाचित्रकाराचाही गौरव करण्यात येईल.

पुण्यातील ज्येष्ठ संपादकांसह मान्यवरांचे ज्युरी मंडळ अत्यंत पारदर्शकपणे या पुरस्कारार्थींची निवड करणार आहे. स्पर्धेचे पारितोषिक वितरण मार्च महिन्यातच होणार आहे. ज्यूरींचा निर्णय अंतिम असेल.

चौकट

पुरस्कारांचे गट

- पुण्यातील मुद्रित माध्यमांसाठी शोधपत्रकारिता (इनव्हेस्टिगेटिव्ह रिपोर्टिंग), पर्यावरण (एनव्हायर्न्मेंटल रिपोर्टिंग), प्रत्यक्ष घटनास्थळावरील वार्तांकन (ऑन द स्पॉट रिपोर्टिंग), नागरी प्रश्न (सिव्हिक इश्यूज), महिलांविषयक प्रश्न (विमेन सेंट्रिक इश्यूज), उत्कृष्ट संपादन आणि मांडणी (एडिटिंग अ‍ॅँड लेआऊट), वृत्तछायाचित्र (फोटो जर्नालिझम) या गटांमधून प्रवेशिका मागविण्यात येत आहे. इलेक्ट्रॉनिक माध्यमांसाठी एक्सक्लुझिव्ह स्टोरी आणि ह्युमन इंटरेस्ट स्टोरी हे दोन गट असतील. प्रत्येक पुरस्कार २५ हजार रुपयांचा आहे.

- वर्क फ्रॉम होमच्या काळात उत्कृष्ट काम करणा-या पत्रकारांसाठी एक गट आहे. त्यासाठी संपादकांच्या पत्रासह आपण केलेले काम पाठवायचे आहे.

- कोरोनाच्या काळात सर्वत्र धास्तीचे वातावरण असतानाही थेट फिल्डवर जाऊन काम करणाऱ्या पत्रकारांसाठीही एक विशेष गट आहे.

- स्पर्धकांनी आपल्या विशेष बातम्या वैयक्तिक माहिती व छायाचित्रासह तीन प्रतिंमध्ये ‘लोकमत’ कार्यालयात प्रत्यक्ष आणून द्याव्यात किंवा टपालाद्वारे पाठवायच्या आहेत.

- प्रवेशिका पाठविण्याचा पत्ता : लोकमत शहर कार्यालय, व्हीया वेन्टेज, २ मजला, सीटीएस ५५/२, एरंडवणे, लॉ कॉलेज रोड, पुणे ४११००४. फोन (०२०) ६६८४८५८६.

- पुणे शहर आणि जिल्ह्यात काम करणा-या सर्व मराठी, हिंदी व इंग्रजी दैनिकांतील पत्रकार या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. ग्रामीण भागात काम करणा-या पत्रकारांसाठी स्पर्धा खुली आहे.

- पुण्यातील ज्येष्ठ संपादकांसह मान्यवरांचे ज्युरी मंडळ अत्यंत पारदर्शकपणे या पुरस्कारार्थींची निवड करणार आहे.

Web Title: Announcement of the second edition of 'Lokmat' Journalism Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.