वीजबिल दुरुस्तीची घोषणा विरली हवेत
By Admin | Updated: March 11, 2017 03:11 IST2017-03-11T03:11:40+5:302017-03-11T03:11:40+5:30
महावितरणच्या वीजबिलासंदर्भातील कारभारासंदर्भात कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे वीज वितरण शाखा कार्यालयात दर गुरुवारी वीजबिल दुरुस्तीची सुविधा तातडीने

वीजबिल दुरुस्तीची घोषणा विरली हवेत
कोरेगाव भीमा : महावितरणच्या वीजबिलासंदर्भातील कारभारासंदर्भात कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे वीज वितरण शाखा कार्यालयात दर गुरुवारी वीजबिल दुरुस्तीची सुविधा तातडीने सुरु करण्याची घोषणा झाली. मात्र दीड वर्षानंतरही अद्याप ठोस कार्यवाही न झाल्याने ग्राहकांना शिक्रापूरलाच चकरा माराव्या लागत आहेत. वीजबिलही ग्राहकांना वेळेवर न मिळाल्याने व्याजाचा भुर्दंड सहन करावा लागत असल्याचे ग्राहक पंचायतीचे भानुदास सरडे यांनी सांगितले.
कोरेगाव भीमा वीज वितरण शाखा कार्यालयांतर्गत कोरेगाव भीमा, सणसवाडी व इतर पाच गावांचा समावेश होतो. यामध्ये ७ हजारापेक्षा जास्त घरगुती, ५०० पेक्षा जास्त औद्योगिक कारखाने व २ हजारापेक्षा जास्त शेतीपंप आहेत. वीजबिल नागरिकांना मुदत संपूनही
मिळत नसल्याने व्याजाचाही भुर्दंड सोसावा लागत आहे. नागरिकांना अनेकदा चुकीची वीजबिले येत असल्याने ती दुरुस्तीसाठी
शिक्रापूर येथील कार्यालयातच जावे लागत आहे.
याबाबत ३० सप्टेंबर २०१५
रोजी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने अधिकाऱ्यांना धारेवर धरल्यानंतर शिक्रापूर
महावितरणचे उपकार्यकारी अभियंता आर. बी गोरे यांनी दर गुरुवारी कोरेगाव भीमा शाखा कार्यालयात वीजबिल दुरुस्तीचा कर्मचारी येऊन ग्राहकांना जागेवरच वीजबिल दुरुस्ती करून देण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. मात्र दीड वर्षानंतरही
कोरेगाव भीमा कार्यालयात
वीजबिल दुरुस्ती केंद्र सुरु न झाल्याने ग्राहकांना नाहक मन:स्तापाला सामोरे जावे लागत असल्याचे ग्राहक पंचायतीचे भानुदास सरडे यांनी सांगितले.
याबाबत शिक्रापूरचे उपकार्यकारी अभियंता आर. बी. गोरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी वीजबिल दुरुस्ती केंद्र सुरू केले होते. मात्र ग्राहकांचा प्रतिसाद न मिळाल्याने वीजबिल दुरुस्ती केंद्र बंद केले असून, पुढील गुरुवारपासून केंद्र पुन्हा कोरेगाव भीमा कार्यालयात सुरू करणार असल्याचे सांगितले.
दुरुस्ती केंद्र सुरू केलेच नाही...
महावितरणचे उपकार्यकारी अभियंता गोरे यांनी वीजबिल दुरुस्ती केंद्र सुरू केले असल्याचे सांगितले आहे, मात्र किती ग्राहकांची वीजबिले दुरुस्ती केली व ग्राहकांच्या किती तक्रारींचे निराकरण केले आहे हे आम्हाला तरी समजू द्या, असा संतप्त सवाल सरडे यांनी केला.