एसटी महामंडळाचा वर्धापनदिन उत्साहात
By Admin | Updated: June 2, 2014 01:48 IST2014-06-02T01:48:32+5:302014-06-02T01:48:32+5:30
महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाचा ६६ वा वर्धापनदिन वल्लभनगर येथील पिंपरी-चिंचवड एसटी आगारात उत्साहात साजरा करण्यात आला.

एसटी महामंडळाचा वर्धापनदिन उत्साहात
नेहरूनगर : महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाचा ६६ वा वर्धापनदिन वल्लभनगर येथील पिंपरी-चिंचवड एसटी आगारात उत्साहात साजरा करण्यात आला. वल्लभनगर आगारामध्ये प्रवाशी व उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न केल्याबद्दल आणि नियमितपणे काम केलेल्या सहायक कारागीर मदन नवगिरे, चालक नंदकुमार महाले, वाहक सच्चिदानंद आदलिंगे, वाहक विजय तुळे यांना आगारप्रमुख आर.डी. शेलोत यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रके देऊन गौरविण्यात आले. स्थानक प्रमुख रोहिणी जाधव, वाहतूक निरीक्षक ऐ. ए. शेख, कार्यशाळा अधीक्षक रवींद्र मराठे, वाहतूक नियंत्रक ज्ञानेश्वर मलशेट्टी, राजेंद्र तांबे आदी उपस्थित होते. या वेळी आगारप्रमुख शेलोत यांनी एसटी महामंडळाविषयी माहिती सांगितली. ते म्हणाले, ‘‘एसटी महामंडळाची स्थापना १ जून १९४८ साली होती व पहिली बस शिवाजीनगर पुणे येथून अहमदनगर येथे सोडण्यात आली होती. सध्या महाराष्ट्रात एकूण २५६ बसडेपो असून १६ हजारपेक्षा जास्त बस महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातील गावात धावत आहेत. १ लाख २५ हजार कर्मचारी महामंडळात कार्यरत आहेत.’’ आगारप्रमुख शेलोत, स्थानक प्रमुख जाधव यांच्या हस्ते वल्लभनगर आगारातील प्रवाशांना गुलाब पुष्प देऊन वर्धापनदिन साजरा करण्यात आला. सूत्रसंचालन मनसे परिवहन विभागाचे संघटक प्रवीण मोहिते यांनी केले. आभार कामगार संघटनेचे अध्यक्ष हरिभाऊ जाधव यांनी मानले. विशेष सत्कार २६ मे रोजी वल्लभनगर येथून चिपळूनकडे एसटी जात असताना या बसमध्ये एका महिलेची बॅग व पर्स बसमध्ये विसरली होती. यामध्ये सोन्याचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल असा एकूण ७० हजारांचा ऐवज होता. हा संपूर्ण ऐवज या बसचे वाहक विजय तुळे यांनी संबंधित महिलेला परत केला. त्यांच्या या प्रामाणिकपणाबद्दल आगारप्रमुख शेलोत यांनी तुळे यांचा विशेष सत्कार केला. (वार्ताहर)