अण्णासाहेब टापरे यांना सेवापदक
By Admin | Updated: February 6, 2017 05:52 IST2017-02-06T05:52:51+5:302017-02-06T05:52:51+5:30
सासवड (ता. पुरंदर) पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अण्णासाहेब साहेबराव टापरे यांना त्यांच्या दुर्गम भागातील नक्षलवादाविरुद्धच्या उल्लेखनीय

अण्णासाहेब टापरे यांना सेवापदक
सासवड : सासवड (ता. पुरंदर) पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अण्णासाहेब साहेबराव टापरे यांना त्यांच्या दुर्गम भागातील नक्षलवादाविरुद्धच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाकडून नुकतेच आंतरिक सुरक्षा सेवापदक मिळाले.
पुण्यातील एका खास समारंभात जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांच्या हस्ते त्यांनी पदक स्वीकारले. या वेळी जिल्ह्याचे अतिरिक्त अधीक्षक राजकुमार शिंदे, उपअधीक्षक (गृह) बरकत मुजावर हेही उपस्थित होते.
देशांतर्गत अतिअडचणीच्या व जोखीम पत्करून दुर्गम भागात किमान दोन वर्षे कर्तव्य बजाविणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यास त्याची तेथील उल्लेखनीय कामगिरी पाहून संबंधितास हे पदक गौरवार्थ दिले जाते. त्यातूनच टापरे यांची या पदकासाठी निवड झाली.
टापरे २०११ मध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून भरती
झाल्यानंतर छत्तीसगडच्या सीमेवर गडचिरोली जिल्ह्यात धानोरी तालुक्यात सावरगाव येथे अतिदुर्गम भागात अडीच वर्षे होते. तेथे नक्षलग्रस्त भागात त्यांनी जोखीम पत्करून उल्लेखनीय कामगिरी करून दाखविली.
नक्षलवाद्यांशी तीन वेळा त्यांची चकमक झाली. त्यांनी विविध घटनांत तीन नक्षलवादीही हत्यारांसह पकडले. या कामगिरीतून त्यांना हे आंतरिक सुरक्षा सेवापदक मिळाले. गतवर्षीही त्यांना राज्याच्या पोलीस महासंचालकांकडून विशेष सेवापदक मिळाले होते.
यंदाचे पदक त्यांनी २६ जानेवारीच्या समारंभात स्वीकारले. सध्या ते गेली दीड वर्ष सासवडला नेमणुकीस आहेत. येथेही त्यांनी कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून कामगिरी बजावत चांगला ठसा उमटविला आहे. गुन्हेविषयक तपासकामात त्यांची कामगिरी चांगली आहे. (वार्ताहर)