इस्लाम व उर्दूचे अभ्यासक अनीस चिस्ती यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:11 IST2021-04-06T04:11:28+5:302021-04-06T04:11:28+5:30
पुणे : इस्लाम व उर्दूचे ज्येष्ठ अभ्यासक आणि लेखक अनीस चिस्ती (वय ७९) यांचे हृदयविकाराने सोमवारी (दि. ५) निधन ...

इस्लाम व उर्दूचे अभ्यासक अनीस चिस्ती यांचे निधन
पुणे : इस्लाम व उर्दूचे ज्येष्ठ अभ्यासक आणि लेखक अनीस चिस्ती (वय ७९) यांचे हृदयविकाराने सोमवारी (दि. ५) निधन झाले. त्यांच्यामागे मुलगी, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.
मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाचे अध्यक्ष मौलाना सय्यद राबे हसन नदवी यांची भेट घेऊन चिस्ती तीन दिवसांपूर्वी लखनऊ येथून पुण्याला परतले होते. त्यानंतर त्यांना त्रास जाणवू लागला. सोमवारी दुपारी त्यांना हृदयविकाराचा त्रास झाला. त्यानंतर शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयांत त्यांना उपचारासाठी नेण्यात आले. मात्र त्यांना वेळेवर खाट मिळू शकली नाही.
अखेर उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. मात्र सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. वेळेत त्यांना उपचार मिळाले असते तर त्यांचे प्राण वाचू शकले असते, असे सांगितले जात आहे. लष्कर परिसरातील दफनभूमीमध्ये त्यांच्या पार्थिवाचे दफन करण्यात आले.
अजमेर येथील ख्वाजा मोईनुद्दीन चिस्ती घराण्याचे वारसदार असलेले अनीस चिस्ती हे बहुभाषा पंडित होते. मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, अरबी, फारसी या भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. मोलेदिना टेक्निकल स्कूल येथून उर्दू आणि इतिहास विषयाचे प्राध्यापक म्हणून ते सेवानिवृत्त झाले होते. लेखणी आणि वाणीच्या माध्यमातून इस्लाम धर्माविषयीचे गैरसमज दूर करण्यासाठी त्यांनी सदैव काम केले. लष्कर आणि पोलीस दलामध्ये त्यांची या विषयावर व्याख्याने होत असत. उर्दू गज़लचे अभ्यासक असलेल्या चिस्ती यांनी ६० पुस्तकांचे लेखन केले होते. रमजानच्या महिन्यात त्यांची लेखमाला गेली अनेक वर्षे ‘लोकमत’मधून प्रसिद्ध होत असे.