हेल्मेटमुळे वाचला जीव

By Admin | Updated: September 3, 2015 03:21 IST2015-09-03T03:21:51+5:302015-09-03T03:21:51+5:30

सिंहगड रोडवर वडगावच्या पुलाजवळ ऐन गर्दीच्या वेळी प्रवासी बस, मारुती व्हॅन आणि दुचाकीचालक यांच्या झालेल्या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले़ त्याच

Animals survived by helmet | हेल्मेटमुळे वाचला जीव

हेल्मेटमुळे वाचला जीव

पुणे : सिंहगड रोडवर वडगावच्या पुलाजवळ ऐन गर्दीच्या वेळी प्रवासी बस, मारुती व्हॅन आणि दुचाकीचालक यांच्या झालेल्या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले़ त्याच वेळी दुसऱ्या दुचाकीवरून जाणारा तरुणही या अपघातात सापडला होता़ मागून वेगाने धडक बसल्यावर तो सिमेंटच्या रोडवर पडला़ सुदैवाने हेल्मेट घातले असल्याने तो बचावला़ याच वेळी तेथून जाणाऱ्या वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी बघ्यांना दूर सारून रिक्षातून जखमींना रुग्णालयात पोहोचविण्याची तत्परता दाखविल्याने त्यांनाही त्वरित उपचार मिळू शकले़
सिंहगड रस्त्यावर वडगाव खुर्द येथे मंगळवारी सकाळी हा अपघात घडला होता़ त्यात दुचाकीचालक नामदेव खुडे आणि विजय जगदाळे हे जखमी झाले़ दुसरे दुचाकीचालक सूरज लोंढे यांनी या अपघाताबाबत सांगितले, की नांदेडकडून वडगावकडे जात असताना पाठीमागून वेगाने एक मिनी बस आली व व्हॅनवर धडकली़ या अपघातात व्हॅनखाली एक दुचाकी सापडून चालक जखमी झाला. त्याच्या पुढेच मी जात होतो़ मागून वेगाने धडक बसल्याने मीही सिमेंटच्या रस्त्यावर पडलो़ सुदैवाने डोक्यात हेल्मेट असल्याने मुका मार बसण्याव्यतिरिक्त काहीही झाले नाही़ मात्र, त्याच वेळी खुडे जबर जखमी झाले होते़ व्हॅनचालकाच्या पायालाही जखम झाली होती़ तेथून जाणारे वाहतूक शाखेचे पोलीस नाईक दीपक झेंडे हे धावत आले व त्यांनी मदत केली़
दीपक झेंडे म्हणाले, ‘‘नेहमीप्रमाणे नांदेड सिटीहून कामासाठी जात असताना माझ्या काही अंतर पुढेच हा अपघात झाला होता़ बघ्यांची मोठी गर्दी झाली होती; पण केवळ ‘उचला रे’ म्हणण्याव्यतिरिक्त कोणीही पुढे येत नव्हते़ खुडे हे व्हॅनखाली गेले होते़ मी मदतीला येण्यास सांगितले; पण कोणीही पुढे झाले नाही़ शेवटी जखमी व्हॅनचालकाच्या मदतीने खुडे यांना बाजूला घेतले; पण त्यांना रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी कोणी थांबत नव्हते़ शेवटी जबरदस्तीने एका रिक्षावाल्याला थांबविले़ त्याला पोलिसी भाषेत समजावून सांगितले, तेव्हा त्याने या दोघांना रुग्णालयात नेले़’’ (प्रतिनिधी)

Web Title: Animals survived by helmet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.