संतप्त जमावाने पेटविला डंपर
By Admin | Updated: March 22, 2016 01:29 IST2016-03-22T01:29:19+5:302016-03-22T01:29:19+5:30
एमआयडीसी रस्त्यावर मंगरुळ फाटा येथे डंपरने दुचाकीला धडक दिल्याने एक तरुणी ठार झाली आणि तिचा भाऊ गंभीर जखमी झाला

संतप्त जमावाने पेटविला डंपर
तळेगाव स्टेशन : एमआयडीसी रस्त्यावर मंगरुळ फाटा येथे डंपरने दुचाकीला धडक दिल्याने एक तरुणी ठार झाली आणि तिचा भाऊ गंभीर जखमी झाला. संतप्त झालेल्या जमावाने डंपर पेटवून दगडफेक करत आग विझविण्यासाठी आलेला अग्निशामक बंब परत पाठविला.
सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास एमआयडीसी रस्त्यावरील मंगरूळ फाटा येथे आंबीकडून मंगरूळकडे जाणाऱ्या खडीच्या डंपरने (एमएच १४ सीपी ४७८०) नवलाख उंबरेकडे जाणाऱ्या दुचाकीला (एमएच १४, झेड ६७६४) धडक दिल्याने दुचाकीवरील विद्या बाळासाहेब दहातोंडे (वय २३ , बधालवाडी, ता. मावळ) ही तरुणी जागेवरच ठार झाली. दुचाकी चालविणारा तिचा भाऊ निलेश बाळासाहेब दहातोंडे (वय १८) गंभीर जखमी झाला. त्याला तळेगाव स्टेशन येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातानंतर डंपरचालक सोमनाथ आत्माराम लवकरे (वय २८, रा. कार्ला, ता. मावळ) हा डंपर जागेवरच सोडून पळून गेला. नंतर त्याला पोलिसांनी अटक केली.
अपघातानंतर काही वेळातच ५०० ते ६०० जणांचा जमाव मंगरूळ फाटा चौकात जमा झाला. घटनास्थळी आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी दुसऱ्या चालकाच्या मदतीने सदर डंपर बाजूला घेऊन पोलीस ठाण्याकडे नेण्याचा प्रयत्न करीत असताना प्रक्षुब्ध जमावाने डंपर व पोलिसांवर दगडफेक केली. त्यात एक पोलीस किरकोळ जखमी झाला. त्यानंतर जमावाने मिनर्वा कॉलेजसमोर डंपरची तोडफोड करत केबिनला आग लावली. संतप्त जमावाने चोहोबाजूची वाहतूक रोखून धरत रास्ता रोको
केला. त्यामुळे जवळपास दोन्ही बाजूने दीड किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. (वार्ताहर)