‘१०८’ ठरले ज्येष्ठ महिलेसाठी देवदूत

By Admin | Updated: November 28, 2015 00:47 IST2015-11-28T00:47:08+5:302015-11-28T00:47:08+5:30

वेळ मध्यरात्री साडेबाराची... इंदापूर-सोलापूर महामार्गावर झालेल्या अपघातामुळे वाहनांच्या लांबच लांब लागलेल्या रांगा... अक्षरश: मुंगीच्या गतीने पुढे सरकणारी वाहतूक

Angels For The Senior Woman '108' | ‘१०८’ ठरले ज्येष्ठ महिलेसाठी देवदूत

‘१०८’ ठरले ज्येष्ठ महिलेसाठी देवदूत

प्रशांत ननवरे, बारामती
वेळ मध्यरात्री साडेबाराची... इंदापूर-सोलापूर महामार्गावर झालेल्या अपघातामुळे वाहनांच्या लांबच लांब लागलेल्या रांगा... अक्षरश: मुंगीच्या गतीने पुढे सरकणारी वाहतूक... या वेळी या वाहतूककोंडीत अडकलेली एक ज्येष्ठ महिला मृत्यूशी संघर्ष करीत होती. मात्र १०८ या रुग्णवाहिका हेल्पलाइनच्या तत्पर सुविधेमुळे परिस्थितीवर मात करीत त्या महिलेला वेळेत उपचार मिळाले आणि तिला जीवदानही मिळाले.
बारामती शहरातील रमेश कुंभार हे त्यांच्या धाकट्या मुलाला विवाहासाठी मुलगी पाहायला मंगळवारी लातूरला गेले होते. या वेळी त्यांच्या समवेत त्यांचा मुलगा गणेश, महेश यांच्यासह त्यांची मोठी बहीण आशा कुंभार, सुरेखा चौगुले आदी १० ते १२ जण कुटुंबीय होते. मुलगी पाहून ते बारामतीला येण्यासाठी निघाले. याच वेळी मध्यरात्री साडेबाराच्या दरम्यान कुर्डुवाडी येथे आशा कुंभार (रा. अंबिकानगर, बारामती) यांना अचानक श्वसननलिकेचा त्रास सुरू झाला.
श्वास घेताना त्यांना धाप लागू लागली. याच दरम्यान, टेंभुर्णी ते इंदापूर दरम्यान अपघात झाल्याने वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. त्यातच मध्यरात्री अचानक हा प्रसंग ओढावल्याने कुंभार कुटुंबीय कमालीचे घाबरून गेले. त्यांची क्रुझर गाडी वाहतुकीतून बाहेर काढण्यासाठी पोलिसांनी मदत देखील केली. मात्र, मोठ्या प्रमाणात कोंडी झाल्याने पोलीस प्रशासनदेखील हतबल ठरले. कुंभार यांच्या धाकट्या बहिणी सुरेखा चौगुले यांनी १०८ क्रमांकाला संपर्क साधला. मध्यरात्र असूनही या क्रमांकावर तत्काळ दखल घेण्यात आली.
रुग्ण अत्यवस्थ असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याच क्षणी सोलापूरमधून शासकीय रुग्णवाहिका तत्काळ निघाली. अत्यंत वेगाने निघालेली रुग्णवाहिकादेखील वाहतुकीच्या कोंडीत अडकली. मात्र, रुग्णापर्यंत पोहोचू न शकल्याने यामध्ये असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी इंदापूरच्या शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधून १०८ क्रमांक सेवेअंतर्गत असणारी रुग्णवाहिका पाठवून दिली. टेंभुर्णी आणि इंदापूर परिसरातील टोलनाक्याजवळ रुग्णवाहिका कुंभार कुटुंबीयांजवळ पोहोचली.
तातडीने रुग्णवाहिकेतील डॉ. रवींद्र खटके यांनी अत्यवस्थ झालेल्या कुंभार यांच्यावर उपचार सुरू केले. या वेळी आॅक्सिजन कृत्रिम श्वसनयंत्रणेद्वारे देण्यात आला. त्यामुळे अत्यवस्थ झालेल्या कुंभार यांना मोठा दिलासा मिळाला. त्यानंतर रुग्णवाहिका तातडीने बारामती शहरातील गिरीराज रुग्णालयाच्या दिशेने आणण्यात आली. येथील डॉ. गणेश आंबोले यांनीदेखील तातडीने उपचार करून कुंभार यांची प्रकृती धोक्याबाहेर आणण्यासाठी प्रयत्न केले. मंगळवारची मध्यरात्र आमच्यासाठी काळ बनून आली होती. मात्र, शासनाच्या १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका सेवा अक्षरश: देवदूत म्हणून धावून आली. त्यामुळे आम्ही आमच्या ‘आत्या’ला जिवंत पाहू शकलो; अन्यथा आनंदाच्या प्रसंगात आमच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला असता, अशी प्रतिक्रिया महेश कुंभार यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.

Web Title: Angels For The Senior Woman '108'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.