- सुधीर गाडगीळ, ज्येष्ठ निवेदक
पुणे : पुण्यातल्या रमणबाग शाळेच्या पटांगणात 'मी... आशा' कार्यक्रम सुरू होता. त्यावेळी आशाताई पंचाहत्तरीत हाेत्या. कार्यक्रम सुरू असताना अचानक पाऊस सुरू झाला अन् आशाताई भिजू लागल्या. त्याचक्षणी मी आणि नाना पाटेकर पुढे झालाे आणि पटकन एक छत्री मिळवून आशाताईंच्या डोक्यावर धरली. त्यावर रसिकांना उद्देशून आशाताई म्हणाल्या ‘मी आजवर अनेक संकटांना सामोरी गेलीय. पाऊस तर काही क्षणांचा आहे. मी त्याला भीत नाही. तुम्ही मंडळी पावसाला भिऊन घरी जाणार की गाणं ऐकणार?" त्यावर रसिकांनीही उत्स्फूर्त दाद देत ‘गाणं ऐकणार...’ असं माेठ्याने सांगितलं. त्यावर बाईंनी पदर खोचला. छत्री बाजूला करायला सांगितली अन् एका पेटीच्या साथीवर भिजत भिजत तब्बल २२ गाणी गायली. श्रोत्यांनीही टाळ्यांचा कडकडाट केला. या अविस्मरणीय अनुभवाचा मी साक्षीदार होतो.
स्वरांचा-उत्साहाचा-जिद्दीचा चैतन्यदायी आविष्कार ‘मी आशा’ कार्यक्रमात अनुभवायला मिळाला होता. मरगळ झटकणारा, नवी उभारी देणारा ताे कार्यक्रम ठरला. आशाताईंचा आवाज म्हणजे सळसळत्या स्वरांचा खळाळता झरा हाेता. या शतकातला प्रार्थनीय सूर म्हणजे आशा भोसले, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.एका भेटीत आशाताई म्हणाल्या हाेत्या की, ‘मध्यंतरीच्या काळात श्रीधर फडकेंच्या काही रचना गायल्या आहेत. त्या रेकॉर्डला नुकतंच बक्षीसही मिळालं आहे. आता एका शोमध्ये नातीबरोबर गाणार आहे. आत्मचरित्राचंही काम सुरू आहे. मराठीतल्या पुस्तकाचं शब्दांकन तर तुम्हीच करताय. इंग्लिशमध्ये माझी एक मैत्रीण लिहितेय. आणखी नवं काय सांगू? दिवाळीत पहाटेचा गप्पांचा कार्यक्रम लवकर ठरवा. मजा करू..." आशाताईंचा हा उत्साह कायम अनुभवता आला. मी आशाताईंना एकदा विचारलं होतं, "तुम्हाला कधी ताण येतच नाही का? आणि जर येत असेल, तर तुम्ही कायम हसतमुख कशा असता?" त्यावर त्या म्हणाल्या हाेत्या की, "समोर जमणारी माणसं आपले प्रश्न, आपल्या अडचणी, आपली संकटं सोडवू शकत नाहीत. आपल्या प्रश्नांना आपल्यालाच सामोरं जावं लागतं, मग त्यांना अडचणीचं रडगाणं ऐकवण्यापेक्षा ते आपुलकीने भोवती जमलेत, तर गाणं गाऊन, गप्पा मारून त्यांना घटकाभर आनंद तरी द्यावा." आशाताईचं हे वक्तव्य पुलंच्या विचारसरणीशी अगदी जवळ जाणारं आहे. मिश्कील बोलण्यानं तर त्या गाण्याइतक्याच रसिकांना जिंकतात. आशाताईंच्या बोलण्यातला खट्याळपणा आपल्याला नेहमी ताजंतवानं करतो. बालपण, तारुण्य आणि वृद्धत्व या वयाच्या सर्व टप्प्यांत पहाटेच्या भूपाळीपासून रात्रीच्या अंगाईगीतापर्यंत, कुठल्याही वेळी, दैनंदिनीच्या कुठल्याही वळणावर आशाताईंच्या स्वरांनी आपल्या सगळ्यांना उभारी दिलेली आहे. लावणी ते अभंग अन् पॉप ते भावगीत असं सारं वैविध्य त्यांनी आजवर मांडल आहे. 'उठी श्रीरामा' सारख्या भूपाळी, 'पंढरीनाथा झडकरी आता', 'ये गं ये गं विठाबाई' ही भक्तिगीते, 'नाच रे मोरा'सारखी बालगीते आशाताईंनी गायली आणि अजरामर झाली. वसंत पवारांच्या काळात पुण्यातल्या पहिल्या ट्रॅक मशीनवर एका दिवसात सात गाणी त्या गायल्या हाेत्या. रेकॉर्डिंगच्या मधल्या वेळात जादूचे प्रयोग करणारे वसंत पवार आशाताईंना आठवतात. दत्ता डावजेकर हे आशाताईचे पहिले संगीतकार. त्यांचे आवडते कवी सुरेश भट हाेते. याचबराेबर आशाताईंना तुरीच्या डाळीची आमटी, गरमागरम भात, लिंबू, लोणकढं तूप हा मेनू फार आवडत असे. पुरणपोळी, बासुंदी, शाही तुकडा, दुधी हलवा असेल तर उत्तमच, असे त्या म्हणत. त्यांच्या उत्तम पाककौशल्याचा अनुभव मी स्वतःही घेतलेला आहे. मला त्यांचा स्वयंपाक घरातला जुना साथीदार नाना आठवतो. 'खाणं' असो, वा 'गाणं' जमत नाही म्हणजे काय? हे आव्हान त्या कायम स्वीकारत आलेल्या आहेत. 'अशक्य' हा शब्द आशाताईंकडे नाहीच.
त्या म्हणत की, "जसा जमाना आला तशी मी बदलत गेले. त्या-त्या जमान्यातल्या स्टाइलमध्ये अडकले असते तर संपले असते. माइक हाच माझा परमेश्वर आणि गाणं हीच माझी पूजा आहे. सतत नवनव्या आव्हानांना सामोरे जात गात राहिले म्हणून जराही थकलेली नाही." मरगळ झटकणारा, परस्परांतला अबोला पुसून टाकणारा, आपल्यासारख्या रसिकांची संगीत संस्कृती आकाराला आणणारा, सुरांचा चैतन्यदायी झंझावात म्हणजे आशा भोसले, असे मी कायम म्हणत आलाे आहे आणि त्याच वाक्याची आज पुन्हा आठवण येत आहे.
Web Summary : Asha Bhosle, undeterred by rain, captivated Pune audience by singing 22 songs. Her zest for life and music was unparalleled, inspiring all. She believed in spreading joy through her art, a philosophy akin to P.L. Deshpande's. Her voice remains a vibrant, timeless treasure.
Web Summary : आशा भोसले ने बारिश की परवाह किए बिना पुणे में 22 गाने गाकर दर्शकों को मंत्रमुग्ध कर दिया। जीवन और संगीत के प्रति उनका उत्साह अद्वितीय था, जिसने सभी को प्रेरित किया। उनका मानना था कि अपनी कला के माध्यम से खुशी फैलाना पी.एल. देशपांडे के दर्शन के समान है। उनकी आवाज एक जीवंत, कालातीत खजाना बनी हुई है।