अन् मतमोजणीच्या वेळी धाकधूक वाढली
By Admin | Updated: February 24, 2017 02:10 IST2017-02-24T02:10:47+5:302017-02-24T02:10:47+5:30
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मतमोजणीच्या वेळी सर्वांची धाकधूक वाढली होती

अन् मतमोजणीच्या वेळी धाकधूक वाढली
मंचर : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मतमोजणीच्या वेळी सर्वांची धाकधूक वाढली होती. मतमोजणीत सुरुवातीला राष्ट्रवादी व शिवसेनेत चुरस दिसत असताना राष्ट्रवादीने नंतर एकतर्फी बाजी मारली.
जिल्हा परिषदेच्या आमोंडी-शिनोली गटातून राष्ट्रवादीच्या रूपा जगदाळे सर्वाधिक ४९४७ तर पेठ-घोडेगाव गटातून शिवसेनेचे देविदास दरेकर सर्वात कमी ३५७ मतांनी विजयी झाले. पंचायत समितीत पारगाव गणातील राष्ट्रवादीचे संजय गवारी सर्वाधिक २७०८ मते मिळवून विजयी झाले, तर शिनोली गणातील राष्ट्रवादीच्या इंदुबाई लोहकरे १५४ या मताधिक्याने विजयी झाल्या.
घोडेगाव येथील मतमोजणी केंद्रात एकाच वेळी १० पंचायत समिती व ५ जिल्हा परिषद गटांची मतमोजणी सुरू झाली. सुरुवातीस अंदाज येत नव्हता, नंतर मात्र चित्र स्पष्ट होत गेले.
पहिल्या दोन-तीन फेरीत शिवसेना राष्ट्रवादीत चुरस होती. नंतर मात्र राष्ट्रवादीने जोरदार मुसंडी मारली. जिल्हा परिषदेचे ४ गट राष्ट्रवादीने जिंकले. सुरुवातीस कळंब-चांडोली गटात आघाडीवर असलेली शिवसेना नंतर मात्र पिछाडीवर गेली.
पेठ-घोडेगाव गटात सुरुवातीस पिछाडीवर असलेले शिवसेनेचे देविदास दरेकर शेवटी शेवटी विजयी झाले. त्यांच्या काळेवाडी-दरेकरवाडी गावाने त्यांना मताधिक्य दिले. जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वाधिक लक्षवेधी लढत पारगावतर्फे अवसरी गटात होती. विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांचे पुतणे विवेक वळसे-पाटील व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरुण गिरे यांच्यात लढत झाली. वळसे-पाटील यांचे मताधिक्य कमी-जास्त होत होते. विवेक वळसे-पाटील यांनी १५९१ मतांनी विजय मिळविला आहे.
जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादीच्या शिनोली-आमोंडी गटातील रूपा जगदाळे सर्वाधिक ४९४७ व शिवसेनेचे पेठ-घोडेगाव गटातील देविदास दरेकर सर्वात कमी ३५७ मतांनी विजयी झाले. पंचायत समिती गणाच्या मतमोजणीत मंचर गणात सर्वांचे लक्ष होते.
अपक्ष उमेदवार राजाराम बाणखेले यांनी तेथे ४७६ मतांनी विजय मिळविला. अवसरी खुर्द गणात शिवसेनेचे वसंत राक्षे सुरुवातीस आघाडीवर होते. मात्र अवसरी व पारगावतर्फे खेड गावांनी राष्ट्रवादीचे उमेदवार संतोष भोर यांना निर्णायक आघाडी मिळवून दिली. घोडेगाव गणात राष्ट्रवादी व शिवसेनेच्या उमेदवारांमध्ये चुरस दिसून आली. अवसरी बु. गणात शिवसेनेचे उमेदवार रवींद्र करंजखेले यांना सुरुवातीस असलेले मताधिक्य नंतर कमी झाले.
शिनोली गणातील राष्ट्रवादीच्या उमेदवार इंदुबाई लोहकरे १५४ मतांनी विजयी झाल्या, तर पारगाव गणातील राष्ट्रवादीचे उमेदवार संजय गवारी २७०८ मतांनी विजयी झाले.
(वार्ताहर)
आंबेगाव तालुक्यातील दिवसभराच्या घडामोडी
१. राष्ट्रवादीने जिल्हा परिषदेच्या ४ जागा मिळवित निर्विवाद यश मिळविले. पेठ घोडेगाव गटातून शिवसेनेचा निसटता विजय.
२. पंचायत समितीच्या सहा जागा राष्ट्रवादीला व शिवसेनेची केवळ एक जागा वाढली. तीन जागांवर त्याचा विजय.
३. अपक्ष उमेदवार राजाराम बाणखेले यांनी दिला शिवसेना व राष्ट्रवादीला धक्का.
४. भाजपा व काँगे्रस पक्ष प्रभावहीन. राज्यात घोडदौड करणाऱ्या भाजपाला अपेक्षित मतदान मिळाले नाही.
५. राष्ट्रवादीने त्यांचे बालेकिल्ले शाबूत ठेवले. शिवसेनेने पेठ-घोेडेगाव जिल्हा परिषद गट राखला.
६. विद्यमान पंचायत समिती सदस्य व माजी सभापती कैलासबुवा काळे पराभूत व जि. प. सदस्या अलका घोडेकर पंचायत समितीत विजयी. माजी उपसभापती संजय गवारी पंचायत समिती पारगाव गणातून विजयी.
७. पंचायत समितीचे सभापतिपद नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी राखीव कळंब गणातील राष्ट्रवादीच्या विजयी उमेदवार उषा कानडे यांना संधी मिळणार व घोडेगाव गणातील शिवसेनेच्या विजयी उमेदवार अलका घोडेकर यासुद्धा शर्यतीत.
८. पारगाव तर्फे अवसरी बु. गटात विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांचे पुतणे विवेक वळसे-पाटील यांचा विजय. जिल्हा परिषदेत पदासाठी प्रबळ दावेदार.