आंबेगव्हाणकरांची परवड थांबणार
By Admin | Updated: March 11, 2017 03:16 IST2017-03-11T03:16:13+5:302017-03-11T03:16:13+5:30
आंबेगव्हाण (ता. जुन्नर) येथील मांडवी नदीवरील पूल नसल्यामुळे शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी व शेतकरी यांना शेतमाल काढण्यासाठी व रोजगारासाठी येणाऱ्या

आंबेगव्हाणकरांची परवड थांबणार
ओतूर : आंबेगव्हाण (ता. जुन्नर) येथील मांडवी नदीवरील पूल नसल्यामुळे शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी व शेतकरी यांना शेतमाल काढण्यासाठी व रोजगारासाठी येणाऱ्या मजुरांना नदीवरून आंबेगव्हाण गावाकडे येताना व जाताना लाकडी पाळण्याचा धोकादायक प्रवास आता थांबणार आहे. येथील साकव पुलाचे काम पूर्ण झाले असून तो लवकरच खुला
होणार आहे.
आंबेगव्हाण येथील मांडवी नदीवर पूल नसल्याने येथील ग्रामस्थांना दोरीवर बांधलेल्या पाळण्यातून धोकादायकरीत्या प्रवास करावा लागत होता. या पाळण्यातून पडून दुर्घटनाही घडल्या होत्या. विद्यार्थ्यांची आणि ग्रामस्थांच्या या होरपळीबद्दल ‘लोकमत’ने दि. ३१ जुलै २०१६ रोजी ‘स्वातंत्र्यानंतरही शिक्षण अधांतरी’ या शीर्षकाखाली वृत्त दिले होते. या वृत्तानंतर शासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली व आंबेगव्हाण या गावाजवळून वाहणाऱ्या मांडवी नदीवरून लाकडी पाळण्यातून शेतकरी व विद्यार्थी कसे येतात, हे पाहण्यासाठी जुन्नरच्या तहसीलदार आशा होळकर, त्यांच्याबरोबर आमदार सोनवणे, अतुल बेनके, सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र थोरात यांनी भेट दिली.
त्यानंतर प्रांताधिकारी व जिल्हाधिकारी कार्यालयातील काही अधिकारी, जिल्हा परिषदेचे अधिकारी यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली व त्यांनी शासकीय पातळीवर साकव पुलाची नितांत गरज असल्याचे सांगितले. महाराष्ट्र शासनाने या साकव पुलासाठी ९८ लाख रुपयांचा निधी तत्काळ मंजूर करून आॅगस्ट २०१६ मध्ये या साकव पुलाच्या कामास प्रारंभ झाला. प्रारंभी नदीपात्रात ७० फूट खोलीचे खड्डे घेऊन त्यात आरसीसी पिलर टाकून त्यांच्यावर स्लॅब ओतण्यात आला. या पुलाविषयी माहिती देताना सामाजिक कार्यकर्ते नीलेश महाले व चिंतामण घोलप म्हणाले, की या पुलाची लांबी ७४ मी, असून, रुंदी २ मी. आहे. पुलाला संरक्षक कठडे बसविले आहेत. सध्या ग्रामस्थांनी पुलाचा वापर सुरू केला आहे. या पुलाच्या उद्घाटनासाठी लवकरच ग्रामस्थ बैठक बोलवणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या पुलाचे उद्घाटन करण्याचा ग्रामस्थांचा मानस आहे. (वार्ताहर)
गेली कित्येक वर्षे आंबेगव्हाण नदी अलीकडील व पलीकडे असणाऱ्या वस्त्यांची येथे पूल व्हावा व जीवघेणा लाकडी पाळणा थांबवावा, अशी मागणी होती. पण, आता पूल झाल्यामुळे ग्रामस्थांची व विद्यार्थ्यांची सोय झाली. त्याबद्दल शासन व आमची व्यथा मांडणाऱ्या दैनिकास धन्यवाद!
- नीलेश म्हात्रे,
सामाजिक कार्यकर्ते
आंबेगाव येथे श्री गजानन महाराज प्रसारक मंडळाची ही माध्यमिक शाळा आहे. शाळा भरण्याच्या वेळेत व सुटण्याच्या वेळेत २ शिक्षकांना जेथे पाळणा आहे त्या ठिकाणी थांबावे लागे. आता पूल झाल्यामुळे शालेय विद्यार्थी सहज आणि सुखरूप येतात आणि जातात.
- माणिक बोऱ्हाडे,
मुख्याध्यापक,
शारदाबाई पवार विद्यालय
या पुलामुळे भोरदरा, गायकरवस्ती तसेच परिसरातील गावांतून शेतमालाची ने-आण करणे शक्य होणार आहे. यामुळे या परिसरात व्यवसाय वृद्धिंगत होणार आहे. पावसाळ्यात दोरीच्या तरफावरून नदी ओलांडणे आता बंद होणार असल्याने आमच्या मनातील भीती दूर होणार आहे.
- चिंतामण घोलप,
सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी