आंबेगाव तालुक्यात युतीचे जागांवरून घोडे अडले
By Admin | Updated: January 25, 2017 01:38 IST2017-01-25T01:38:01+5:302017-01-25T01:38:01+5:30
राज्यात, जिल्ह्यात युती किंवा आघाडीबाबात कोणताही निर्णय होताना दिसत नाही. असे असले तरी आंबेगाव पंचायत समिती

आंबेगाव तालुक्यात युतीचे जागांवरून घोडे अडले
मंचर : राज्यात, जिल्ह्यात युती किंवा आघाडीबाबात कोणताही निर्णय होताना दिसत नाही. असे असले तरी आंबेगाव पंचायत समिती ताब्यात घेण्यासाठी शिवसेना व भाजपाचे स्थानिक नेतृत्व सकारात्मक असल्याचे दिसते. आघाडीबाबात राष्ट्रवादी व काँग्रेस स्वबळावर लढण्याची तयारी करीत आहेत.
मागील जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी, शिवसेना-भाजपा व काँग्रेस पक्ष स्वबळावर लढले होते. मात्र खरी लढत राष्ट्रवादी व शिवसेनेत झाली. भाजपा व काँग्रेसच्या उमेदवारांना दोन मुख्य पक्षांच्या तुल्यबळ लढतीत कमी मते मिळाली होती.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे बिगूल वाजताच आघाडी अथवा युती होणार का, याची चर्चा सुरू झाली. तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना हे दोन्ही पक्ष भक्कम स्थितीत आहेत. भाजपाची ताकद मागील काही दिवसांपासून वाढू लागली आहे. काँग्रेस पक्षाचा पारंपरिक मतदार कायम आहे. त्यामुळे निदान पंचायत समिती ताब्यात घेण्यासाठी प्रमुख पक्षांना इतर पक्षांची मदत होऊ शकेल, असे जाणकार सांगतात. सुरुवातीस युती अथवा आघाडीबाबत चर्चा सुरू होती. मात्र नंतर चर्चा पुढे गेलीच नाही.
काँग्रेसची ताकद मर्यादित आहे, जरी काँग्रेसचा पारंपरिक मतदार असला तरी राष्ट्रवादी काँगे्रसची ताकद पाहता ते काँग्रेसशी आघाडी करण्यास फारसे उत्सुक नाहीत. दुसरीकडे भाजपाची ताकद काही प्रमाणात वाढू लागली आहे.
भाजपा स्वतंत्र लढल्यास तो शिवसेनेची मते खाईल व त्याचा फायदा राष्ट्रवादीला होईल. त्यामुळे शिवसेना-भाजपा युतीसाठी प्रयत्न केले जात आहेत. अर्थात भाजपाची अवास्तव जागांची मागणी शिवसेना मान्य करेल का, हा प्रश्न आहे. (वार्ताहर)