जादूच्या दुनियेची अद्भूत सफर आणि कोरोना वॉरियर्सचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:17 IST2021-02-05T05:17:00+5:302021-02-05T05:17:00+5:30
पुणे : बारा महिन्यानंतर जादूचे प्रयोग ''अनलॉक'' होत आहेत. येत्या 31 जानेवारीला जादूगार जितेंद्र रघुवीर जादूच्या दुनियेची अद्भुत सफर ...

जादूच्या दुनियेची अद्भूत सफर आणि कोरोना वॉरियर्सचा सन्मान
पुणे : बारा महिन्यानंतर जादूचे प्रयोग ''अनलॉक'' होत आहेत. येत्या 31 जानेवारीला जादूगार जितेंद्र रघुवीर जादूच्या दुनियेची अद्भुत सफर घडविणार आहेत. माणसाचे दोन तुकडे, टिकटॅक्ट, ओव्हन मॅजिक, रिंगो मॅजिक असे जवळपास ५० इफेक्टचे नवीन विस्मयकारक खेळ हे या कार्यक्रमाचे आकर्षण ठरणार आहे. यावेळी कोरोना वॉरियर्स सन्मानही करण्यात येणार आहे.
कोरोनाच्या लॉकडाऊन काळात संपूर्ण कलाविश्व ठप्प झाल्याने या व्यवसायावर आधारित अनेक पडद्यामागच्या कलाकारांवर उपासमारीची वेळ आली. अनलॉकनंतर संगीत, सांस्कृतिक कार्यक्रम आणि नाटकांचे प्रयोग रंगू लागले .मात्र जादू ही एक वर्षानंतर खऱ्या अर्थाने अनलॉक होत आहे..जादूच्या खेळाची जिवंत अनुभूती लहान मुलांसह कुटुंबांना देण्यासाठी जादूगार जितेंद्र रघुवीर रविवारी ( दि.३१) जादूचे दोन खास प्रयोग घेऊन येत आहेत. पहिला प्रयोग हा बालगंधर्व रंगमंदिर येथे दुपारी १२.३० वाजता रंगणार आहे तर यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे सायंकाळी ५.३० वाजता जादूच्या खेळासह एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमामध्ये कोरोना काळात जीवाची पर्वा न करता काम केलेले डॉक्टर्स विक्रम दळवी, समीर घोटावडेकर, ऋषीकेश दामले, सुपर्ण खळदकर तसेच ‘लोकमत’च्या बातमीदार नम्रता फडणीस यांच्यासह इतर माध्यम प्रतिनिधींना व समाजाला निधी उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेणारे चितळे बंधू मिठाईवालेचे केदार चितळे यांचा '' कोरोना वॉरिअर्स'' म्हणून सन्मान केला जाणार आहे. रविवारी ( दि.३१) होणाऱ्या या विशेष सोहळ्यात अनिकेत प्रकाश आमटे आणि समीक्षा अनिकेत आमटे तसेच बृहन महाराष्ट्र मंडळ नॉर्थ अमेरिकेचे प्रतिनिधी राजीव केतकर उपस्थित राहणार आहेत.