अमर साबळेंच्या रूपाने शहराला तिसरा खासदार

By Admin | Updated: March 11, 2015 01:05 IST2015-03-11T01:05:41+5:302015-03-11T01:05:41+5:30

राज्यसभेसाठी अमर साबळे यांना उमेदवारी निश्चित झाल्याने पिंपरी-चिंचवड शहरातील भाजपा कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.

Amar Sawal forms the third member of the city | अमर साबळेंच्या रूपाने शहराला तिसरा खासदार

अमर साबळेंच्या रूपाने शहराला तिसरा खासदार

पिंपरी : राज्यसभेसाठी अमर साबळे यांना उमेदवारी निश्चित झाल्याने पिंपरी-चिंचवड शहरातील भाजपा कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. दोन दिवसांपूर्वीच भाजपाचे सहकार आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सचिन पटवर्धन यांची लेखा समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. एकाच आठवड्यात पाठोपाठ घडलेल्या या दोन घटना शहर भाजपाला नवसंजीवनी देणाऱ्या मानल्या जात आहेत.
राज्यसभेसाठी अमर साबळे यांचे नाव निश्चित झाल्याचे वृत्त पसरताच भाजपाच्या कार्यकर्त्यांसह कुटुंबीयांनीही आनंदोत्सव साजरा केला. या दोन निवडींमुळे शहरातील राजकीय समीकरणे बदलतील, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
भारतीय जनता पक्षाचे नेते, पक्षश्रेष्ठी यांच्याशी जवळचा संपर्क असलेले कार्यकर्ते, अशी साबळे यांची ओळख आहे. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे निकटवर्तीय असलेल्या साबळे यांना मुंडे यांच्या पश्चात मोठ्या पदावर संधी मिळणे अनपेक्षित होते. भाजपाच्या अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष व प्रदेश कार्यकारिणी सदस्य अशा महत्त्वाच्या पदांची जबाबदारी साबळे यांनी पेलली आहे. निष्ठावान कार्यकर्ता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. २००९च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाकडून त्यांना पिंपरी विधानसभा मतदारसंघात उमेदवारीही देण्यात आली होती. पिंपरी-चिंचवड शहराशी निवडणुकीपूर्वी काहीच दिवस अगोदर संबंध आल्याने त्या निवडणुकीत त्यांना यश मिळाले नाही. दुसऱ्या क्रमांकाची मते त्यांनी मिळविली. यश आले नाही म्हणून खचून न जाता पक्षकार्यात कायम सक्रिय राहिले.
शहराध्यक्ष तसेच इतर पदाधिकाऱ्यांच्या निवडीत अथवा इतर कार्यक्रमांत नेहमीच गडकरी व मुंडे असे शहरात दोन गट असल्याची चर्चा असायची. अमुक-अमुक पदाधिकारी या गटाचा आहे, असे म्हटले जायचे. साबळे यांचीही ओळख गोपीनाथ मुंडे गटाचे, अशीच आहे. दरम्यान, ३ जूनला २०१४ला मुंडेंचे अपघाती निधन झाले. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत पिंपरी मतदारसंघातून साबळे यांचे नाव निश्चित मानले जात असतानाच हा मतदारसंघ आरपीआयला सोडण्यात आला. यामुळे साबळे यांना माघार घ्यावी लागली. मुंडे गटाचे असलेल्या साबळे यांना पक्षाकडून पुन्हा संधी मिळेल का? अशी शंका उपस्थित केली जात होती.
मुंडे यांच्या निधनानंतरही साबळे यांच्या गळ्यात खासदारकीची माळ पडल्याने पक्षात गटतट नसल्याचे श्रेष्ठींनी दाखवून दिल्याचे, कार्यकर्त्यांकडून बोलले जात आहे.
अशातच साबळे यांना अनपेक्षितपणे थेट खासदारपदाची संधी मिळाली. पक्षाचे प्रामाणिकपणे काम करून पक्षवाढीत योगदान दिलेले वाया जात नाही, योग्य वेळी दखल घेतली जाते, असा संदेश भाजपा कार्यकर्त्यांमध्ये या निवडीच्या माध्यमातून गेला आहे. पुण्यात भाजपाचे आठ आमदार निवडून आले. त्यामुळे महत्त्वाच्या पदांवर संधी देताना पक्षाकडून आता पिंपरी-चिंचवडमधील कार्यकर्त्यांचा प्राधान्याने विचार होऊ लागला आहे. पक्षाककडून संधी मिळते, याची प्रचिती आल्याने कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
पक्ष संघटना मजबूत होण्यास हे वातावरण पूरक ठरेल, असे
आशादायी चित्र निर्माण झाले
आहे. केंद्र आणि राज्यासह महापालिकाही ताब्यात यावी यासाठी श्रेष्ठींनी तयारी सुरू केली आहे. अशातच शहरात भाजपाला एक आमदार, एक खासदार मिळाला आहे. त्यामुळे पक्षाची ताकत वाढली असून, २०१७च्या महापालिका निवडणुकीकडे भाजपाने लक्ष केंद्रित केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Amar Sawal forms the third member of the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.