माळीण पुनर्वसनासाठी आमडेची जागा योग्य

By Admin | Updated: September 11, 2015 04:35 IST2015-09-11T04:35:22+5:302015-09-11T04:35:22+5:30

माळीणचे पुनर्वसन होत असलेल्या आमडे जागेत पुन्हा कोणताही धोका निर्माण होऊ नये, यासाठी लेआउटमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या उपाययोजना व ग्रामस्थांच्या

Amani's place for rehabilitation | माळीण पुनर्वसनासाठी आमडेची जागा योग्य

माळीण पुनर्वसनासाठी आमडेची जागा योग्य

घोडेगाव : माळीणचे पुनर्वसन होत असलेल्या आमडे जागेत पुन्हा कोणताही धोका निर्माण होऊ नये, यासाठी लेआउटमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या उपाययोजना व ग्रामस्थांच्या गरजा पाहून तयार केलेली घरांची रचना योग्य
असल्याचा अभिप्राय नगररचना विभागाने दिला आहे. नवनियुक्त सहायक संचालक उत्तम भोपळे यांनी माळीणला भेट दिली व नव्या जागेची पाहणी केली.
नगररचना विभागाने यापूर्वीच माळीण पुनर्वसनासाठी तयार करण्यात आलेल्या लेआउटला परवानगी दिली आहे. भोपळे यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. आमडे जागेबाबत जीएसआयने दिलेला अभिप्राय व पुनर्वसनाबाबत वेगवेगळ्या बैठकांमध्ये झालेली चर्चा ऐकून उत्तम भोपळे यांनी आमडे जागेची पहाणी करण्याचे व यापूर्वी मंजूर केलेल्या लेआउटची शहानिशा करण्याचे ठरविले होते.
त्याप्रमाणे उत्तम भोपळे, सहायक नगररचनाकार श्वेता कुऱ्हाडे, आर्किटेक्ट योगेश राठी, उपअभियंता एस. बी. देवढे यांनी आमडे जागेला भेट दिली. या पाहणीत कमीत कमी खोदाईत व भरावामध्ये तयार केलेले प्लॉट, प्लॉटमध्ये काढण्यात आलेले रस्ते, प्रत्येक घराचा जोडरस्ता, मुख्य रस्त्यापासून शेवटच्या घरापर्यंत रुग्णवाहिला, फायर ब्रिगेडची गाडी जाईल असा सुटसुटीत रस्ता, प्लॉटमध्ये साठणारे पाणी काढून देण्यासाठी काढलेली गटारे यांची पाहणी केली.
या पाहणीत आमडेची जागा व त्यानुसार तयार केलेला लेआउट योग्य असल्याची खात्री त्यांना पटली व त्यांनी त्याला मान्यता दिली. तसेच, यापूर्वी नगररचना विभागाने लेआउटसाठी केलेल्या कामाची प्रशंसा केली.
या पाहणी दौऱ्यानंतर घोडेगाव येथे प्रांत अधिकारी कल्याणराव पांढरे व तहसीलदार बी. जी. गोरे यांच्याशीदेखील त्यांनी आमडेची जागा व लेआउट याबाबत चर्चा केली. तयार करण्यात आलेला लेआउट उत्तम असल्याचे मत भोपळे यांनी व्यक्त केले. (वार्ताहर)

संरक्षक भिंत बांधावी
आमडे जागेच्या वरच्या बाजूला डोंगर असल्याने एक मोठी संरक्षक भिंत बांधली जावी, अशी सूचना त्यांनी केली. अशी भिंत यामध्ये समाविष्ट असल्याचे श्वेता कुऱ्हाडे व योगेश राठी यांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिले. मात्र, ही भिंत याहीपेक्षा मोठ्या आकाराची व भक्कम असावी, अशी सूचना त्यांनी केली.

Web Title: Amani's place for rehabilitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.