औंध-बाणेरच्या स्मार्ट खर्चामुळे प्रभागांमध्ये होणार असमतोल
By Admin | Updated: December 4, 2015 02:46 IST2015-12-04T02:46:43+5:302015-12-04T02:46:43+5:30
महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी बुधवारी स्थायी समितीसमोर स्मार्ट सिटी प्रकल्पाचा साडेतीन हजार कोटी रुपयांचा आराखडा सादर केला. त्यामध्ये बाराशे कोटी रुपये

औंध-बाणेरच्या स्मार्ट खर्चामुळे प्रभागांमध्ये होणार असमतोल
पुणे : महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी बुधवारी स्थायी समितीसमोर स्मार्ट सिटी प्रकल्पाचा साडेतीन हजार कोटी रुपयांचा आराखडा सादर केला. त्यामध्ये बाराशे कोटी रुपये केवळ मॉडेल एरिया म्हणून निवडलेल्या औंध-बाणेरवर खर्च होणार असल्याने प्रभागांमध्ये विकासाचा असमतोल निर्माण होणार आहे. यापूर्वी मोठी विकासकामे झालेल्या भागातच पुन्हा मोठा खर्च करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.
केंद्र शासनाने स्मार्ट सिटीचा प्रस्ताव पाठविताना एका मॉडेल एरियाची निवड करून पाठविण्यास सांगितले होते. या मॉडेल एरियामध्ये झोपडपट्टी, मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय असा सर्व प्रकारचा परिसर असला पाहिजे, असे बंधन ठेवण्यात आले होते. त्यानुसार महापालिका प्रशासनाने औंध-बाणेर परिसराची मॉडेल एरिया म्हणून निवड केली आहे.
या भागामध्ये यापूर्वीच विकासकामांवर मोठा निधी खर्च करण्यात आला आहे. प्रभागातील स्थानिक नगरसेवक बाबूराव चांदेरे स्थायी समितीचे अध्यक्ष असताना त्यांनी या भागाच्या विकासकामांसाठी मोठा निधी मिळविला होता. या भागामध्ये प्रामुख्याने उच्चभ्रू सोसायट्यांचे प्रमाण मोठे आहे. प्रभागातील रस्ते प्रशस्त आहेत. घनकचरा व्यवस्थापन योग्य आहे. पाण्याचा पुरवठा मुबलक आहे.
स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी येत्या ५ वर्षांमध्ये साडेतीन हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. त्यांपैकी १,३०० कोटी रुपये केवळ औंध-बाणेरच्या प्रभागामध्ये खर्च करण्यासाठी प्रस्तावित केले आहेत. औंध भगातून जाणाऱ्या नदीचा विकास केला जाईल, त्यासाठी १४० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सोलर एनर्जीचे प्रकल्प राबविण्यासाठी २८० कोटी रुपये देण्यात येणार आहेत. सांडपाण्याचा पुनर्वापर करण्याचे प्रकल्प या भागात राबविले जाणार असून, त्याकरिता ९० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
औंध भागातील वाहतूक व्यवस्थेचे सुसूत्रीकरण करण्यासाठी तब्बल साडेपाचशे कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये प्रभागात सायकल ट्रॅकची उभारणी केली जाणार आहे. रस्त्यांचे सुसूत्रीकरण, पदपथनिर्मिती करून वाहतूकव्यवस्था गतिमान करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. औंध परिसरामध्ये झोपडपट्ट्यांच्या विकासासाठी दहा कोटी रुपये प्रस्तावित केले आहेत.
झालेलीच कामे पुन्हा होण्याची भीती
स्मार्ट सिटी प्रकल्पामध्ये चांगल्या स्थितीमध्ये असलेले रस्ते पुन्हा चकाचक होतील, जुने पदपथ उखडून नवे बांधले जातील, रंगरंगोटीची कामे होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. औंध-बाणेर भागाच्या निवडीला मुख्य सभेकडून मान्यता देताना नगरसेवकांनी अगोदरच विकसित असलेल्या औंध-बाणेरची निवड करण्याऐवजी पेठांच्या किंवा उपनगरातील अविकसित प्रभागाची निवड करण्याची जोरदार मागणी केली होती.
महापालिकेचा अर्थसंकल्प मांडताना अविकसित भागांसाठी जास्त निधी देण्याचा प्रयत्न केला जातो. प्रभागातील असमतोल कमी करण्याचा त्यातून प्रयत्न केला जातो. मात्र, स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत विशिष्ट प्रभागासाठी हजार कोटींचा निधी देऊन असमतोल वाढविण्याचा प्रयत्न केला जात असल्याची टीका केली जात आहे.