आंबवडे चार दिवसांपासून अंधारात
By Admin | Updated: June 6, 2016 00:35 IST2016-06-06T00:35:42+5:302016-06-06T00:35:42+5:30
खोऱ्यातील गावांचा विद्युत पुरवठा चार दिवसांपासून बंद असल्याने या परिसरातील नागरिकांना, पोल्ट्री व्यावसायिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे.

आंबवडे चार दिवसांपासून अंधारात
नेरे : आंबवडे (ता. भोर) खोऱ्यातील गावांचा विद्युत पुरवठा चार दिवसांपासून बंद असल्याने या परिसरातील नागरिकांना, पोल्ट्री व्यावसायिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे.
चार दिवसांपूर्वी भोर आणि परिसरात वादळीवाऱ्यासह पाऊस पडला. त्यामुळे आंबवडे परिसरातील गावांना कामथडी फिडरवरील निगुडघर सबस्टेशनवरून वीजपुरवठा करणाऱ्या तारांचे खांब हारतळी येथे पडले. त्यामुळे विद्युत पुरवठा बंद झाला आहे. दुरुस्तीचे काम महावितरणचे कर्मचारी करीत आहेत; मात्र हे काम धीम्या गतीने चालू आहे. महावितरणच्या कर्मचारी व अधिकारी यांनी मेंटेनसचे काम उन्हाळ्यात केले असते, तर ही परिस्थिती ओढवली नसती, असे नागरिकांकडून बोलले जात आहे. महावितरणच्या भोंगळ कारभाराचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
लवकरात लवकर महावितरणने या भागातील वीजपुरवठा सुरळीत करावा; अन्यथा जनता महावितरणच्या अधिकारी व कर्मचारी यांना जाब विचारल्याशिवाय राहणार नाही, असे या भागातील संतापलेल्या नागरिकांकडून ‘लोकमत’शी बोलताना सांगण्यात आले.