महुडे व वेळवंड खोऱ्यात भातपेरणीची लगबग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:13 IST2021-06-09T04:13:55+5:302021-06-09T04:13:55+5:30
भोर तालुक्याचा पश्चिम भाग म्हणजे महुडे व वेळवंड भाग होय हा दुर्गम व डोंगरी भाग आहे. सध्या माॅन्सूनपूर्व पावसाने ...

महुडे व वेळवंड खोऱ्यात भातपेरणीची लगबग
भोर तालुक्याचा पश्चिम भाग म्हणजे महुडे व वेळवंड भाग होय हा दुर्गम व डोंगरी भाग आहे. सध्या माॅन्सूनपूर्व पावसाने चांगली सुरुवात केल्याने शेतजमिनीचा चांगला वापसा असल्याने शेतकऱ्यांनी भाताचे तरवे टाकण्यास सुरुवात केली आहे.
या परिसरात पावसाचे प्रमाण भरपूर असल्याने शेतकऱ्याला भाताचे तरवे हे एकतर धूळवाफेत पेरावे लागतात किंवा पाऊस सुरुवात झाल्यावर तरवे टाकावे लागतात. यंदा मॉन्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकरी आनंदाने भाताचे तरव टाकत आहे. इंद्रायणी, तमसाल, रत्नागिरी, रत्नागिरी २४, आंबेमोहोर, कोलम, सोनम, कोळंबा अशा अनेक प्रकारचे भाताचे वाण आहेत. या परिसरात म्हणजे महुडे, माळेवडी, ब्रम्हणघर, नांद, शींद, गवदी, किवत, भोलावड, बसरापूर, पसुरे, वेळवंड, बारे या गावांतून भाताचे तरवे टाकण्यात शेतकरी मग्न असलेला दिसत आहे.
या भागात भात हे मुख्य पीक आहे. यात हळव्या आणि गरव्या भाताची लागवड केली जात असून, गरव्या जातीत इंद्रायणी, बासमती, तामसाळ, हळवे बारीक या जाती, तर हळव्या जातीत, रत्नागिरी २४, कर्जत १८४, सोनम, इंडम, फुळेराधा या जातीच्या वाणांची लागवड केली जाते.
हळव्या जातीचे भातपीक ९० ते १०० दिवसांत तयार होते. याला पाणी कमी लागते, तर गरव्या जातीचे भात १०० ते १२० दिवसांत तयार होते. याला अधिक प्रमाणात पाणी लागते. या परिसरातील इंद्रायणी या जातीच्या तांदळाला जास्त प्रमाणात बाजारात मागणी असते.
पारंपरिक भाताचे वाण नष्ट होताना दिसत आहेत. सध्या संकरित भाताचे वाण बाजारात उपलब्ध असल्याने याला उत्पन्न भरपूर मिळत आहे. या भाताच्या जातीकडे वापरण्यास शेतकऱ्यांचा कल वाढलेला दिसत आहे, असे मत प्रगतशील शेतकरी सागर खाटपे यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले.
भाताचे तरव टाकताना शेतकरी सागर खाटपे.
छाया - स्वप्नीलकुमार पैलवान